मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवसेनेचेही अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती दिली. अंबादास दानवे म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या भेटीसाठी आलो होतो, भेट झाली. मागच्या तीन-चार महिन्यापासून प्रत्यक्ष भेट नव्हती. या भेटीत त्यांचे वेगवेगळे अनुभव, किस्से यावर गप्पा मारल्या. येणाऱ्या काळात संजय राऊत शिवसेना नेते म्हणून महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने नवा लढा उभारतील.”
त्याचप्रमाणे शिवसैनिकांकडून तेजस ठाकरे यांना राजकारणात सक्रीय करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले की, “तेजस ठाकरे राजकारणात येणार की नाही याबाबत मला काही माहिती नाही. कारण, अशाप्रकारची मागणी शिवसैनिकांकडून होत असते. परंतु, राजकारणात येणार की नाही यावर स्वतः तेजस ठाकरेच निर्णय घेतील. मी त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही.” पुढे त्यांनी मोर्चा राऊतांवर वळवत “महाराष्ट्रात आणि देशात संजय राऊतांची प्रतिमा लढाऊ नेते अशी आहे.” असे सांगण्यास ते चुकले नाही. तसेच राऊतांवर सत्ताधारी भाजपाकडून जोरदार टीकाही होत आहे. किरीट सोमय्यांनी हिशोब द्यावा लागेल म्हटलंय, तर मोहित कुंबोज यांनी पुन्हा घराबाहेर पडावं लागेल, असं म्हणत राऊतांना टोला लगावला. तसेच, “संजय राऊत यांच्याशी आगामी मुंबई विधानसभा निवडणुका आणि इतरही चर्चा झाल्या. मात्र, त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात. चर्चा झाली हे नक्की,” असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
must read