न्युयॉर्क : अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील एका घरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पण मृतदेह पाहून कोणाच्याही मनात भीती निर्माण होईल असे ते चित्र आहे. घराच्या आत त्याच्या बॉडीभोवती किमान 124 सापांनी वेढले होते. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, मेरीलँडमधील चार्ल्स काउंटीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, त्या व्यक्तीने आपल्या घरात शेकडो साप पिंजऱ्यात ठेवले होते, त्यापैकी काही अत्यंत विषारी होते. मृताच्या शेजाऱ्यांपैकी एकाने त्याला दिवसभर पाहिले नाही. त्यानंतर तो त्याच्या घरी तपासणीसाठी गेला. शेजाऱ्याने पोलिसांना सांगितले की, जेव्हा कोणीही दरवाजा ठोठावण्यास प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याने खिडकीतून आत डोकावले. त्याला 49 वर्षीय व्यक्ती जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी 911 वर कॉल केला. आपत्कालीन सेवांनी तेथे पोहोचून त्या व्यक्तीची तपासणी केली असता तो मृत आढळून आला.
मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्तापर्यंत, कोणतेही षड्यंत्र किंवा चुकीचे असे कोणतेही संकेत नाहीत. चार्ल्स काउंटी शेरीफच्या कार्यालयाने अहवाल दिला आहे की, घराच्या आत रॅकवर ठेवलेल्या टाक्यांमध्ये वेगवेगळ्या जातींचे 100 हून अधिक विषारी आणि बिनविषारी साप आढळले आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीने त्याच्या घरात अजगर, रॅटलस्नेक, कोब्रा आणि ब्लॅक मांबा यासह विविध प्रकारचे साप ठेवले होते. पोलिसांनी सांगितले की, प्राणी नियंत्रण अधिकारी सापांची तपासणी करत आहेत. काउंटीच्या मुख्य प्राणी नियंत्रण अधिकाऱ्याने पोलिसांना सांगितले की, ‘त्यांच्या 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवात त्यांनी अशी घटना कधीच पाहिली नव्हती.’ चार्ल्स काउंटी अॅनिमल कंट्रोल उत्तर कॅरोलिना आणि व्हर्जिनिया येथील सर्प तज्ज्ञांच्या मदतीने सापांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेरीलँड कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून साप ठेवू शकत नाही.