Karanataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka Election Results) पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्विट केले आहे. या विजयाबद्दल पंतप्रधानांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बंपर विजय मिळाला आहे. काँग्रेसने आतापर्यंत 119 जागा जिंकल्या असून 17 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 56 जागा जिंकल्या असून 9 जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी पक्षाचा जोरदार प्रचार केला.
पंतप्रधानांनी ट्विट करून काँग्रेसच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मी काँग्रेसचे अभिनंदन करतो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांचेही आभार मानले. कर्नाटक निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे ट्विट त्यांनी केले. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीला माझा सलाम. आगामी काळात कर्नाटकची अधिक तत्परतेने सेवा करू.
प्रत्यक्षात कर्नाटकात 38 वर्षापासून कोणत्याही पक्षाला सलग दोनदा निवडणुका जिंकता आलेल्या नाहीत. कर्नाटकच्या जनतेने या निवडणुकीतही ही परंपरा कायम ठेवली आहे. काँग्रेसने यावेळी कर्नाटकात दमदार कामगिरी करत मोठा विजय नोंदवला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय साकार केला. भाजपला पराभवाचा झटका बसला. यंदा काँग्रेसने तिकीट वाटप, उमेदवारांची निवड, प्रचार, निवडणुकीचे व्यवस्थापन या प्रत्येक बाबतीत आघाडी घेतली होती. भाजपनेही प्रचार केला मात्र पक्षातील बंडखोरी, नाराजी, अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कट करणे यांसारख्या गोष्टींमुळे पराभवाचा सामना करावा लागला.
यानंतर आता काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. डीके शिवकुमार की सिद्धरामय्या यांपैकी मुख्यमंत्री कोण होईल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.