Petrol : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमती कमी होतील असे वाटत नाही. कारण, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात इंधनाचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात म्हणावे तितके मोठे बदल केलेले नाहीत. मात्र, आज शुक्रवारी (19 ऑगस्ट) दोन शहरात पेट्रोलचे दर कमी करण्यात आले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी ठरवलेल्या दरानुसार आज सकाळी नोएडामध्ये (Noida) पेट्रोल 24 पैशांनी स्वस्त झाले. आज दिल्लीमधील (Delhi) नागरिकांना प्रति लिटरमागे 96.76 रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. 89.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. लखनऊमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) प्रतिलिटर 5 पैशांनी दर स्वस्त झाले आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 100 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. याचा अर्थ कच्च्या तेलाच्या वाढत्या दबावामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही शक्यता खरी ठरेल का हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे तेल कंपन्यांचा तोटा वाढत असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाच्या (Fuel) किंमती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे घडले तर देशातील सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांना आणखी त्रासदायक ठरणार आहे.
देशात आधीच पेट्रोलच्या किंमतीनी शंभरचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी डिझेलही शंभरच्या पुढे गेले आहे. दर इतके भरमसाठ वाढल्याने देशांतर्गत महागाई वाढली आहे. खाद्य पदार्थांच्या किंमतीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आम आदमी हैराण झालेला असताना सरकारकडून फारसे दिलासादायक निर्णय घेतले जात नाहीत. महागाई कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी ते तितकेसे परिणामकारक ठरत नसल्याचे दिसून येत आहे.