Pankaja Munde । राजकीय घडामोडींना वेग! पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री, बॅनर्सवरून चर्चा सुरु

Pankaja Munde । राज्यात नुकताच विधानपरिषदेचा निकाल लागला. या अटीतटीच्या लढतीत महायुतीने जोरदार कमबॅक केले आहे. या निवडणूकीत महायुतीचे ९ आणि ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाला आहे. शेकापच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे बीडच्या माजलगावमध्ये भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले असून माजलगाव शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये ही बॅनरबाजी केली आहे. माजलगाव परिसरातील ब्रह्मगावचे उपसरपंच अनिल कांबळे यांनी हे बॅनर लावले असून या बॅनरवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भावी उपमुख्यमंत्री म्हणून पोस्टर

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगताना दिसत आहे. राज्यात आता पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीची चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री असणार का? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सध्या आनंदाचं वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पंकजा मुंडेंचे ‘भावी उपमुख्यमंत्री’ असे म्हणत अभिनंदन केल्याचे पोस्टर माजलगावमध्ये झळकले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“पाच वर्षानंतर मला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. मी पुन्हा एकदा सक्रियपणे काम करेल. दोन समाजांच्या जातीचा प्रश्न सध्या निर्माण झाला असून तो प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. राजकारणामध्ये एकदाच खोटं बोलून मत मिळवता येतात. पण पुन्हा अशा पद्धतीने मतं मिळवता येणार नाही”, असेही विधानपरिषदेतील विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

Leave a Comment