Paneer Toast : पनीर टोस्टचे (Paneer Toast) नाव ऐकताच मुलांच्या चेहऱ्यावर हसू येते. पनीर टोस्ट हा नाश्ता म्हणूनही एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे. बर्याचदा घरांमध्ये हा मोठा प्रश्न पडतो की, नाश्त्यात पौष्टिक आणि स्वादिष्ट असा कोणता पदार्थ बनवायचा. खरं तर, रोज तोच नाश्ता (Breakfast) करताना कंटाळा येतोच. विशेषत: लहान मुले असलेल्या घरांमध्ये ही समस्या अधिकच वाढते. जर तुम्हालाही अशीच समस्या भेडसावत असेल आणि लहान मुलांसह सर्वांनाच पसंत असणारा आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असा नाश्ता बनवायचा असेल, तर तुम्ही प्रथिनांनी युक्त पनीर टोस्ट रेसिपी वापरून पाहू शकता. हे बनवायला सोपे आहे आणि पनीर टोस्ट बनवायला जास्त वेळ लागत नाही. पनीर टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊ या..
साहित्य – ब्रेड – 4-5, किसलेले पनीर – 1 कप, लोणी – 1 चमचा, अर्धा कांदा, टोमॅटो – 1, अद्रक-लसूण पेस्ट – 1 चमचा, सिमला मिरची – 1/2, लाल तिखट – 1/2 चमचा, हळद – 1/4 चमचा, टोमॅटो सॉस – 2 चमचे, कोथिंबीर – 2 चमचे, हिरवी चटणी – ४ चमचे, काळी मिरी पावडर – 1/4 चमचे, मीठ – चवीनुसार.
रेसिपी
पनीर टोस्ट बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर बारीक करून घ्या. आता एका पातेल्यात बटर टाकून मध्यम आचेवर गरम करा. लोणी गरम होऊन वितळल्यावर त्यात काही बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालून तळून घ्या. यानंतर बारीक केलेला कांदा, अद्रक-लसूण पेस्ट टाकून शिजू द्या. यानंतर त्यात बारीक केलेली सिमला मिरची टाकून थोडा वेळ परतून घ्या.
आता या मिश्रणात बारीक केलेला टोमॅटो टाका आणि कांदा आणि टोमॅटो दोन्ही मऊ होईपर्यंत तळा. यानंतर त्यात लाल तिखट, काळी मिरी पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकून चांगले मिसळून घ्या. आता या मिश्रणात टोमॅटो सॉस टाका आणि मसाल्यातून सुगंध येईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या. मिश्रण चांगले शिजल्यावर त्यात किसलेले पनीर टाकावे व शेवटी बारीक केलेली हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घ्यावे. पनीरचे मिश्रण तयार आहे. यानंतर ब्रेड घ्या आणि नॉनस्टिक तव्याव दोन्ही बाजूंनी बटर लावून भाजून घ्या. ब्रेडचा रंग सोनेरी तपकिरी झाल्यावर पॅनमधून काढून घ्या. आता ब्रेडभोवती हिरवी चटणी लावा आणि त्यावर पनीरचे मिश्रण पसरवा. शेवटी, टोस्ट अर्धा कट करून घ्या. तुमचा स्वादिष्ट पनीर टोस्ट तयार आहे.