Palak Paneer Recipe : पनीर खायला कोणाला आवडत नाही? बहुतेक लोकांना पनीरपासून (Palak Paneer Recipe) बनवलेल्या पदार्थांचे वेड असते. पनीरपासून बनवलेल्या पाककृतींची चवही अप्रतिम असते आणि सर्व वयोगटातील लोक त्याचा खूप आनंद घेतात. सध्या नवरात्रीचा सण (Navratri) सुरू असून लोकांना लसूण-कांदा न टाकता खाद्यपदार्थ खायला आवडतात. तुम्हीही रात्रीच्या जेवणासाठी अशी रेसिपी शोधत असाल तर पालक पनीर एकदा नक्की करून बघा. लसूण आणि कांद्याशिवाय पालक पनीर तुम्हाला वेड लावेल. पालक आणि पनीरचे हे स्वादिष्ट मिश्रण आहे. पालक आणि पनीरच्या चांगल्या गुणांनी समृद्ध असलेली ही रेसिपी रात्रीचे जेवण निरोगी बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालून पालक पनीरची चव वाढवू शकता. तुम्ही या पनीर रेसिपीला बटरने सजवू शकता. आम्ही तुम्हाला पालक पनीरची सोपी रेसिपी सांगत आहोत.
साहित्य
पालक पनीर हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे आणि तो बनवण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींची गरज आहे. या अप्रतिम पदार्थासाठी तुम्हाला 250 ग्रॅम पालक, पनीरचे चौकोनी तुकडे 1 कप, हिरव्या मिरच्या 3-4, थोडे अद्रक, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, जिरे 1 चमचा , 3-4 लवंगा, 1 तुकडा दालचिनी, काही तमालपत्र, 2 वेलची, क्रीम २ चमचे, 1/2 चमचा गरम मसाला, 2 चमचे कसुरी मेथी, 1 चमचा बटर, 1/4 कप तेल आणि चवीनुसार मीठ आवश्यक आहे. या सर्व गोष्टींसह तुम्ही स्वादिष्ट पालक पनीर तयार करू शकता.
रेसिपी
सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी भरून पालक स्वच्छ करून त्यात टाका. गॅसवर ठेवा आणि 1 शिटी होऊ द्या. यामुळे पालक उकळेल. यानंतर गॅस बंद करा आणि कुकर थंड झाल्यावर पालक बाहेर काढा आणि एका भांड्यात ठेवा, त्यानंतर मिक्सरमध्ये पालक आणि 3-4 हिरव्या मिरच्या घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. यानंतर पेस्ट एका भांड्यात ठेवा. आता एका कढईत तेल आणि बटर घालून गरम करा. बटर वितळल्यावर त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर तळलेले पनीर बाहेर काढून एका भांड्यात ठेवा. आता कढईत थोडे तेल टाकून त्यात जिरे, लवंगा, वेलची, दालचिनी, कसुरी मेथी आणि तमालपत्र टाकून तळून घ्या.
यानंतर पॅनमध्ये चिरलेला टोमॅटो घाला आणि थोडा वेळ शिजू द्या. टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात आधी तयार केलेली पालक पेस्ट, थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही शिजवून घ्या. रस्सा उकळायला लागल्यावर त्यात तळलेले पनीर टाका, नीट मिक्स करून भाजी शिजू द्या. भाजी चांगली शिजल्यावर त्यात कसुरी मेथी, फ्रेश क्रीम आणि गरम मसाला घालून मिक्स करा. अशा प्रकारे तुमचे पालक पनीर तयार आहे. गरमागरम भात, रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता.