Pakistan : पाकिस्तानतला (Pakistan) हाय होल्टेज ड्रामा अजूनही संपलेला नाही. आता माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यासह त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात टेन्शन वाढले आहे.
इम्रान खान सध्या त्यांच्या घरी असून या घराभोवती पोलिसांचा वेढा आहे. त्यांच्या घरात काही दहशतवादी लपले असल्याचा आरोप केला जात आहे. या दहशतवाद्यांना स्वाधीन करण्यासाठी पंजाब सरकारने दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सरकार आणि इम्रान खान यांच्यात आरपारची लढाई होईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने खान यांच्या लाहोर येथील घरात लपून बसलेल्या 30 ते 40 आतंकवाद्यांना सोपविण्यासाठी बुधवारी दुपारी 24 तासांची मुदत दिली होती. तसेच कडक कारवाईचाही इशारा दिला होता. ही मुदत आज संपली. त्यामुळे येथील स्थिती सध्या तणवाची आहे. या घराला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरले आहे. मोठे कंटेनरही येथे आहे. जर कारवाई करण्याची वेळ आलीच तर इम्रान खान यांना येथून पळून जाणे शक्य होणार नाही, यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या पाकिस्तानातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. इम्रान खान सध्या बाहेर असले तरी त्यांना कधीही अटक होऊ शकते. आता तर सरकारने त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यांच्या घरात दहशतवादी लपल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सरकारने कारवाई करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याचेच यातून दिसून येत आहे.
या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील वातावरण अत्यंत तणावाचे बनले आहे. जगाचेही या परिस्थितीवर लक्ष आहे. भारताकडूनही पाकिस्तानातील या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. पाकिस्तानातील वातावरण निवळण्याचे प्रयत्न होत असले तरी त्याने काहीच फरक पडलेला नाही. आता शाहबाज सरकार काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.