Pakistan : पाकिस्तानातील (Pakistan) पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील निवडणुकांसाठी निधी न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पाकिस्तान सरकारला दिला. संरक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. देशातील सार्वत्रिक निवडणुकांसोबतच दोन्ही प्रांतातील निवडणुका घ्याव्यात, असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले होते.
पाकिस्तानचे सरन्यायाधीशांसह तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पंजाब प्रांतात 14 मे रोजी निवडणुका घेण्याचा दिलेला आदेश मागे घेण्याची विनंती या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला केली होती. निवडणुकीसाठी 21 अब्ज पाकिस्तानी रुपये निवडणूक आयोगाला देण्यात यावेत, असेही सांगण्यात आले.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये 14 मे रोजी निवडणुका झाल्या तर देशात अराजकता पसरू शकते. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात आयोगाने म्हटले आहे की, देशातील सध्याचे राजकीय वातावरण आणि सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेली माहिती पाहता पंजाब प्रांतात निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततापूर्ण निवडणुका घेणे शक्य नाही.
पोलिसांना लष्कर आणि इतर एजन्सींचे सहकार्य न मिळाल्यास मतदार, निवडणूक कर्मचारी आणि सामान्य जनतेच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा धोक्यात येईल. पंजाबमध्ये सुरक्षेसाठी किमान 4,66,000 जवानांची गरज असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने निधी न दिल्याने निवडणुका वेळेवर होण्याची शक्यता फार कमी आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार प्रांतीय असेंब्ली विसर्जित झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत निवडणुका होणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला पंजाब आणि खैबर-पख्तुनख्वामध्ये निवडणुका घेण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत निवडणूक आयोगाला 21 अब्ज रुपये देण्याचे आदेश दिले होते.
खान यांनी केले भारताचे कौतुक
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. भारताप्रमाणेच रशियाकडूनही स्वस्तात कच्चे तेल मिळविण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. पण मला माहीत आहे की, अविश्वास प्रस्तावाद्वारे माझे सरकार पाडल्यानंतर सध्याचे सरकार तसे करण्यास सक्षम नाही अशी टीकाही त्यांनी आताच्या सरकारवर केली.
इम्रान खान यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे देशाला संबोधित करताना सांगितले की, आमच्या सरकारला भारताप्रमाणे रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करायचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. माझे सरकार षड्यंत्राने पाडण्यात आले.
23 वर्षांत इम्रान हे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाला भेट देणारे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते. याआधीही इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे.
पीठासाठी हाहाकार
दहशतवादाला कायमच खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात (Pakistan Crisis) आज भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील लोकांना दोन वेळचे अन्न मिळणेही अतिशय दुरापास्त झाले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. गरीबी आणि बेरोजगारी या समस्यांनी सगळेच हैराण झाले आहेत. आता तर अशी वेळ आली आहे की खाद्य पदार्थांसाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडत आहेत.
या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन लोकांना प्राणही गमवावे लागत आहेत. आता तर खाद्य पदार्थांसाठी लोक लुटमारही करायला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मानसेहरा येथील ओघी तहसीलच्या करोरी भागातील वितरण केंद्रातून लोकांनी मोफत गव्हाच्या पिठाच्या पिशव्या लुटल्या आणि पळ काढला. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले.
पाकिस्तानमध्ये मोफत वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसा सरकारी योजनेंतर्गत मोफत पीठ मिळण्यासाठी लोकांनी नियुक्त केलेल्या आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.