नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात पाकिस्तानातील नागरिक वाढत्या महागाईने हैराण झाले आहेत. देशात कोरोना काळात महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. महागाई कमी करण्यात येथील सरकारला अपयश आले आहे. आता तर सरकारने असे काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे देशातील महागाई आणखी वाढणार हे निश्चित आहे. असे असतानाही पाकिस्तानचे राज्यकर्ते मात्र या संकटाची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. त्यांनी या संकटास चक्क कोरोनास जबाबदार धरले आहे. होय, देशातील महागाईत वाढ होण्यास कोरोना आजार हे देखील एक कारण आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले आहे.
डॉनच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना पाकिस्तानमध्ये वेगाने वाढणाऱ्या महागाईबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, महागाईची समस्या ही जागतिक समस्या आहे. इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमध्ये जेव्हा आमचे सरकार नियुक्त झाले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे किमती वाढू लागल्या. ते म्हणाले की, कोविड महामारीमुळे अनेक देश पुरवठ्याच्या समस्येचा सामना करत आहेत. ब्रिटन आणि युरोपीय देशांचे नाव घेत इम्रान खान म्हणाले की, या देशांनाही महागाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानातील जनता महागाईने हैराण आहे. ते म्हणाले की, महागाईमुळे सर्वात जास्त त्रास पगारदार लोकांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नुकत्याच आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे, की जर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) उपक्रम या वर्षाच्या जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुन्हा सुरू झाला नाही तर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे अडचणीत येईल.
पॉलिसी रिसर्च ग्रुपच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पाकिस्तानला 8.638 अब्ज डॉलरची रक्कम बाह्य कर्जापोटी द्यावी लागेल. गेल्या चार वर्षांत विदेशी कर्जाचे देणे तब्बल 399 टक्क्यांनी वाढले आहे. 2017-18 मध्ये ते 286.6 अब्ज रुपये होते आणि आता ते 1,427.5 अब्ज रुपये होणार असल्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानची चालू खात्यातील तूट (CAD) आणि परकीय चलनाच्या साठ्यात वेगाने घट होत आहे. पहिल्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर) विदेशाकडून 3 अब्ज डॉलर, IMF कडून 2 अब्ज अमेरिकन डॉलर आणि आंतरराष्ट्रीय Eurobonds द्वारे 1 बिलियन पेक्षा जास्त कर्ज घेतले आहे असे असताना स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) कडे 31 डिसेंबर 2021 पर्यंत केवळ 17.6 अब्ज डॉलर परकीय चलन साठा होता.
कोरोनाने दिला जोरदार झटका, आणि पाकिस्तानने ‘तो’ निर्णयच फिरवला; पहा, देशात काय होणार बंद..?