Pakistan News : इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेपासून ते सुटकेपर्यंत पाकिस्तानात (Pakistan) खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांच्या अटकेसाठी पाकिस्तानी लष्कराला जबाबदार धरले आहे. त्यामुळेच पाकिस्तानभर लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले झाले आहेत.
या संकटाच्या काळात पाकिस्तानी नागरिकांवर आणखी एक संकट आधिक गडद झाले आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपया सर्वात कमी पातळीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे देशात आधीच वाढलेली महागाई आणखी भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची ही सर्वात कमी पातळी राहिली आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपया 306 अमेरिकी डॉलरवर उघडला आणि व्यवहाराच्या सुरुवातीच्या काही तासांत सातत्याने घसरत गेला. नंतर 33 टक्के घसरणीसह 300.25 च्या पातळीवर पोहोचला.
रुपया आणखी घसरणार असल्याचे येथील तज्ज्ञ सांगत आहेत. देशातील सध्याच्या परिस्थितीचा व्यापारावर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. हिंसक घटनांमुळे कारखान्यातील कामकाज ठप्प झाले आहे. भाजीपाला, फळे यांसारखी रोज निर्यात होणाऱ्या वस्तू जागेवरच पडून राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या सर्व कारणांमुळे काही दिवसांत महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. लोकांना धान्य सुद्धा मिळेनासे झाले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की खाद्यपदार्थांसाठी हाणामारीच्या घटनााही घडू लागल्या आहेत.
वीस किलो पीठाची किंमत अडीच हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तान दुसऱ्या देशांकडून तांदूळ आणि नैसर्गिक वायू यांची आयात करतो. यासाठी सुद्धा आता कर्ज घ्यावे लागत आहे. या सर्वांसाठी पाकिस्तान सरकारला मोठा खर्च करावा लागतो.