Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना 9 मे रोजी अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे त्यांच्याविरोधात दाखल तीन गुन्ह्यांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी इम्रान खान यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
लाहोर दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) त्यांना 2 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आणि तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले. खान यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी एक लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊसवरील हल्ल्याशी संबंधित आहे.
जामीन मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खान म्हणाले की, गेल्या 35 वर्षांत त्यांनी सरकारची अशी कारवाई कधीच पाहिली नव्हती. असे दिसते की सर्व मूलभूत अधिकार संपले आहेत, आता फक्त न्यायालये मानवी हक्कांचे रक्षण करत आहेत.” खान पुढे म्हणाले की काहीही झाले तरी ते अखेरपर्यंत लढत राहतील.
9 मे रोजी निमलष्करी दलाच्या पाकिस्तान रेंजर्सनी इम्रान खानला अटक केल्याने पाकिस्तानमध्ये अशांतता पसरली. पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच आंदोलकांनी रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर सरकारने इम्रानवर हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला.
हिंसक चकमकीत मृतांची संख्या 10 वर पोहोचल्याचे सांगितले जात आहे तर खान यांच्या पक्षाने दावा केला की सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचे 40 कार्यकर्ते मारले गेले.
वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी पाकिस्तान आर्मी अॅक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टसह देशाच्या संबंधित कायद्यांतर्गत नागरी आणि लष्करी आस्थापनांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे म्हटले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अविश्वास ठराव गमावल्यानंतर खान यांना सत्तेतून हटवण्यात आले होते. सत्तेवर आल्यानंतर इम्रान यांनी रशिया, चीन आणि अफगाणिस्तानबाबत स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांमुळे अमेरिकेच्या नेतृत्वाने कटाचा एक भाग म्हणून आपल्याला लक्ष्य केल्याचा आरोप केला होता.