Pakistan News : पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan) अत्यंत खराब झाली आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. लोकांना धान्य सुद्धा मिळेनासे झाले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की खाद्यपदार्थांसाठी हाणामारीच्या घटनााही घडू लागल्या आहेत.
वीस किलो पीठाची किंमत अडीच हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तान दुसऱ्या देशांकडून तांदूळ आणि नैसर्गिक वायू यांची आयात करतो. यासाठी सुद्धा आता कर्ज घ्यावे लागत आहे. या सर्वांसाठी पाकिस्तान सरकारला मोठा खर्च करावा लागतो.
आश्चर्य म्हणजे, अशी भीषण परिस्थिती असतानाही पाकिस्तानात पेट्रोलचे दर प्रति लिटर 12 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच डीझेल देखील स्वस्त झाले आहे.
पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी सोमवारी घोषणा केली की पुढील 15 दिवसांपर्यंत पेट्रोलचे दर 12 रुपये आणि डीझेलच्या किंमती 30 रुपयांनी कमी केल्या जातील.
शाहबाज सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे देशातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या दर कपातीमुळे पेट्रोलची किंमत 270 रुपये प्रति लिटर अशी झाली आहे.
डीझेलमधील 30 रुपये दर कपातीनंतर 258 रुपये प्रति लिटर झाले आहे. या व्यतिरिक्त रॉकेलच्या किंमतीतही 12 रुपये कपात करण्यात आली आहे. रॉकेलच्या नव्या किंमती 164.07 रुपये आणि लाइट डीझेलची किंमत 12 रुपयांनी कमी होऊन 152.68 रुपये प्रति लिटर अशी झाली आहे.
पाकिस्तान सरकारने मागील काही महिन्यात इंधनाच्या किंमती बेसुमार वाढवल्या होत्या. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या विदेशी मुद्रा भांडारात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या देशांकडून महत्वाच्या वस्तू खरेदी करून देशात आणण्याची पाकिस्तानची स्थिती राहिलेली नाही. पाकिस्तानात पीठ, तांदूळ आणि कांद्याच्या दरात बेसुमार वाढ झाली आहे.
या परिस्थितीत बदल करण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या कर्जाची गरज आहे. त्यासाठी सरकारने 1.1 अब्ज डॉलरच्या कर्जाची मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली आहे. मात्र आयएमएफने अद्याप या कर्जाला मंजुरी दिलेली नाही.