Pakistan : पाकिस्तानातील (Pakistan) जनतेला आधीच महागाईचा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. आता या महागाईत सरकारच्या निर्णयाची भर पडली आहे. संपूर्ण देशात पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या दराने 300 चा टप्पा पार केला आहे. आता पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 305.36 रुपये आणि डिझेलचा दर 311.84 रुपयांवर पोहोचला आहे.
स्थानिक वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर 14.91 रुपये आणि हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) ची किंमत 18.44 रुपये प्रति लिटरने वाढवली आहे.
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. स्थानिक अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 290.45 रुपये प्रति लीटरवरून 305.36 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय 293.40 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाणारे डिझेल 18.44 रुपयांनी वाढून 311.84 रुपये प्रतिलिटर झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 300 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.
पाकिस्तानी रुपया घसरला
यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी इंधनाच्या दरात प्रतिलिटर 20 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी आंतरबँक बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 1.09 रुपयांनी घसरले. सध्या एक डॉलर म्हणजे 306 पाकिस्तानी रुपये आहेत.
वाढती महागाई
त्याच वेळी, काळजीवाहू प्रणाली लागू झाल्यापासून रुपया 4.6 टक्क्यांनी घसरला आहे. ऑगस्टपर्यंत रुपयाचे मूल्य 6.2 टक्क्यांनी घसरले आहे. स्थानिक वृत्तपत्र डॉनने अलीकडेच वृत्त दिले आहे की, 17 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानातील महागाई दर वर्षीच्या आधारावर 27.57 टक्क्यांनी वाढली असून यामध्ये मुख्यत्वे पेट्रोलियमच्या किमतीनी मोठे योगदान दिले आहे.