Pakistan Inflation : आशियाई विकास बँकेचा एक अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार पाकिस्तानमधील महागाई दर (Pakistan Inflation) 25 टक्क्यांच्या वर गेला आहे. संपूर्ण आशिया खंडाचा विचार केला तर आजघडीला पाकिस्तानात सर्वाधिक महागाई असल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था 1.9% दराने वाढत आहे. जी आशियातील चौथी सर्वात मंद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. पाकिस्तानात सध्या मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशात महागाई तर वाढली आहेच त्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. देशातील वाढती महागाई नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत परंतु त्यामुळे फारसा फरक पडताना दिसत नाही.
पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रीब्यून वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की आशियाई विकास आऊटलूकनुसार पाकिस्तानचे पुढील आर्थिक वर्ष 2024-25 देखील निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये पुढील आर्थिक वर्षात महागाई 15 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मनीला स्थित क्रेडिट एजन्सीने सांगितले की चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 25% असेल जो संपूर्ण आशियात सर्वाधिक आहे. यामुळे पाकिस्तान हा आशियातील सर्वात महागडा देश ठरला आहे.
Pakistan Inflation
पाकिस्तान दीर्घ काळापासून महागाईच्या समस्येला तोंड देत आहे. जागतिक बँकेने मागील आठवड्यात म्हटले होते, की पाकिस्तानातील 10 दशलक्ष लोक गरिबीच्या संकटात अडकू शकतात. पाकिस्तानातील सुमारे 98 दशलक्ष लोक आधीच दारिद्र्यरेषेखाली आहेत. एबीडीच्या अहवालात म्हटले आहे की पाकिस्तानला आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागेल आणि त्यांना पुन्हा नवीन कर्ज घ्यावे लागेल.
दुसरीकडे नवीन कर्जासाठी पाकिस्तानचे अर्थमंत्री पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला जाणार आहेत. यादरम्यान ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानला कर्ज देण्याचा विचार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी करत आहे. आशियाई विकास बँकेने सांगितले की या कर्जानंतर पाकिस्तानमध्ये महागाई वाढू शकते. कारण आयएमएफ कर्ज वसूल करण्यासाठी पाकिस्तानवर कर वसूल करण्यासाठी दबाव टाकू शकते.
Pakistan News : आधी राष्ट्रपती आता पंतप्रधान! पाकिस्तान सरकारच्या ‘या’ निर्णयाची जगभरात चर्चा
Pakistan Inflation
दरम्यान, पाकिस्तानात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा नव्या सरकारलाही सामना करावा लागत (Pakistan News) आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यानंतर आता पंतप्रधान शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देशाचे आर्थिक स्थिती पाहता पगार न घेण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार सरकारने अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाच्या काटकसरीच्या धोरणानुसार वेतन व त्यासंबंधीचे सर्व लाभ माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.