Pakistan News : आर्थिक संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानकडे (Pakistan) आता निवडणुका घेण्यासाठीही पैसे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही देशाच्या फेडरल सरकारने पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील मध्यावधी निवडणुकांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. आता न्यायालयाने देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित रेकॉर्डसह १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहून पैसे का दिले नाहीत, हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने निधी न दिल्याने निवडणुका वेळेवर होण्याची शक्यता फार कमी आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार प्रांतीय असेंब्ली विसर्जित झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत निवडणुका होणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला पंजाब आणि खैबर-पख्तुनख्वामध्ये निवडणुका घेण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत निवडणूक आयोगाला 21 अब्ज रुपये देण्याचे आदेश दिले होते.
मात्र, सरकारने निधी देण्याऐवजी निवडणूक आयोगाला आवश्यक निधी देण्याचे विधेयक संसदेत सादर केले आहे. या विधेयकावर अद्याप मतदान झालेले नाही. पंजाबमध्ये १४ मे रोजी निवडणुका होणार आहेत, तर खैबर पख्तुनख्वामध्ये निवडणुकीची तारीख निश्चित झालेली नाही.
न्यायालयाचा पाळला नाही म्हणून न्यायालयाने वित्त सचिव, स्टेट बँक ऑफ पाकिस्तान, ऍटर्नी जनरल आणि पाकिस्तान निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून अधिकाऱ्यांना 14 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. फेडरल सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे म्हणजे प्रथमदर्शनी अवज्ञा आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
न्यायालय फेडरल सरकारच्या या अवमानाबद्दल गंभीर आहे. आर्थिक आघाडीवर आणि महागाईवर जनतेच्या संतापामुळे पाकिस्तान सरकारला निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक आयोगाला पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
खान यांनी केले भारताचे कौतुक
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. भारताप्रमाणेच रशियाकडूनही स्वस्तात कच्चे तेल मिळविण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. पण मला माहीत आहे की, अविश्वास प्रस्तावाद्वारे माझे सरकार पाडल्यानंतर सध्याचे सरकार तसे करण्यास सक्षम नाही अशी टीकाही त्यांनी आताच्या सरकारवर केली.
इम्रान खान यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे देशाला संबोधित करताना सांगितले की, आमच्या सरकारला भारताप्रमाणे रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करायचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. माझे सरकार षड्यंत्राने पाडण्यात आले.
23 वर्षांत इम्रान हे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाला भेट देणारे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते. याआधीही इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे.