Pakistan : दहशतवादाला कायमच खतपाणी घालून त्याला संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानची वाट संकटात सापडली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) चीनने मोठा धक्का दिला आहे. चीनने (China) पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेचे कारण देत नवीन बेल्ट अँड रोड प्रकल्प नाकारले आहेत.
चीनने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला
Nikkei Asia च्या अहवालानुसार चीनने नवीन बेल्ट अँड रोड प्रकल्प नाकारण्यामागे पाकिस्तानची सुरक्षा परिस्थिती आणि राजकीय अस्थिरता हे कारण सांगितले आहे. पाकिस्तानने चीनकडून गुंतवणुकीचे आवाहन केले होते. मात्र, चीनने पाकिस्तानचे आवाहन फेटाळून लावले. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (China Pakistan Economic Corridor) अंतर्गत ऊर्जा, हवामान बदल, पॉवर ट्रान्समिशन लाइन आणि पर्यटनाशी संबंधित आणखी प्रकल्प जोडण्याच्या पाकिस्तानच्या शिफारशी चीनने नाकारल्या. चीनने चीनच्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीचे केंद्र असलेल्या ग्वादरच्या दक्षिणेकडील बंदराला कराचीपासून राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडण्यासाठी 500 किमी लांबीची ट्रान्समिशन लाइन बांधण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
याशिवाय ग्वादरमध्ये 300 मेगावॅटच्या कोळशावर आधारित पॉवर प्लांटवर चीनने पाकिस्तानला आपला आक्षेप मागे घेण्यास भाग पाडले आहे. CPEC साठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था संयुक्त सहकार्य समिती (JCC) ची 11 वी बैठक गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती परंतु या वर्षी जुलैमध्ये त्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
Nikkei Asia च्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी स्थानिक मीडियाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या नियोजन आणि विकास मंत्रालयाने म्हटले आहे की चीन आणि पाकिस्तान जलस्रोत व्यवस्थापन, हवामान बदल आणि पर्यटन यांसारख्या सहकार्याच्या नवीन क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी CPEC ची व्याप्ती वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.