नवी दिल्ली : पाकिस्तानातील लोकांना कार खरेदी करणे आता आधीपेक्षा जास्त कठीण होणार आहे. कारण, त्यांच्याच सरकारने अशी वेळ देशावर आणली आहे. देशात नवीन वाहनांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. ARY न्यूजनुसार, पाकिस्तान संसदेने सामान्यतः “मिनी-बजेट” म्हणून ओळखले जाणारे वादग्रस्त विधेयक मंजूर केले आहे. याअंतर्गत कारवरील कर 100% वाढला आहे. या विधेयकास विरोधी पक्ष आणि नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत सरकारने हे विधेयक मंजूर केले आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय देखील नव्हता.
अहवालानुसार, देशाच्या सिंध उत्पादन शुल्क आणि कर विभागाने वित्त कायदा 2022 द्वारे करांवरील करात वाढ केली आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांच्या टीकेनंतरही हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता 1001 सीसी ते 2000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारवरील कर 2 लाख रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वी 1 लाख रुपये होता.
आता 2001cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या कार मालकांना 4 लाख रुपये कर भरावा लागेल. देशाच्या ऑटोमोटिव्ह उद्योगाचे अतोनाच नुकसान करणारा हा निर्णय असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानमधील एकूण विक्रीत या श्रेणीतील कारचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे, वाढीव किंवा कमी करांसह मागणीत वाढ आणि घट होण्याची अधिक शक्यता असते. पाकिस्तान सध्या प्रचंड कर्जात असून देशातील महागाई सुद्धा अत्यंत वेगाने वाढत आहे. याआधी पंतप्रधान इम्रान खान यांनीही देशात वस्तू आणि इंधनाच्या किमती वाढल्याने देशातील लोकांना महागाईचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अर्थव्यवस्था अत्यंत खराब परिस्थितीत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशांतर्गत करात वाढ करण्याचा उपाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तान सरकारला दिला होता. त्यानुसार, आता सरकारने मिनी बजेट तयार केले. आता हे विधेयक मंजूर झाले आहे. आधीच देशात महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता ही सरकार पुरस्कृत दरवाढ ठरणार आहे.
अर्र.. घ्या आता.. ‘त्यासाठी’ ही कोरोनाच जबाबदार; पहा, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी काय केलाय दावा..
कोरोनाने दिला जोरदार झटका, आणि पाकिस्तानने ‘तो’ निर्णयच फिरवला; पहा, देशात काय होणार बंद..?