Onion Export । कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! सरकारने घेतला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे

Onion Export । कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. सरकारने कांद्यावरील ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू केली होती. त्यामुळे शेतकरी निराश झाले होते.

तसेच सरकारने निर्यात बंदी लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. सरकारने कांदा निर्यात बंदीसारखा निर्णय मागे घ्यावा यासाठी, सतत शेतकरी आंदोलन करत होते. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी मागे घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली असून शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान, या निर्यात बंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. पण डेडलाईन संपण्यापूर्वी सरकारने ही बंदी मागे घेतली आहे.

कांदा निर्यातीवरील बंदी हटवताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांद्याच्या साठ्याचा विचार केला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली होती. चर्चा करुन सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा विचार करत असल्याची माहिती काही दिवसांपासून समोर आली होती. अखेर आज केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली असून सरकारने बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे.

Leave a Comment