Imran Khan News : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे निकटवर्तीय त्यांना सोडून जात आहेत. आता त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. बुधवारी फवादने ट्विटर हँडलवर ही माहिती देत इम्रानला आणखी एक झटका दिला. फवादच्या जाण्याने इम्रानसोबतच पीटीआयलाही मोठा धक्का बसला आहे. फवादनेही इम्रान खानसोबतचे संबंध तोडले आहेत.
फवाद यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ‘माझ्या आधीच्या विधानाचा संदर्भ घेऊन मी 9 मेच्या घटनांचा स्पष्ट निषेध केला होता. मी राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असून इम्रान खानपासूनही वेगळे होत आहे.
इम्रान खान यांना उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला होता. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) इम्रान यांना अटक केली होती.
आतापर्यंत अनेक नेत्यांनी इम्रान खान यांची साथ सोडली आहे. तज्ज्ञांच्या मते, पीटीआयचे नेते ज्या पद्धतीने पक्ष सोडत आहेत, त्या पद्धतीमुळे पीटीआय केवळ कमकुवत होणार नाही, तर आधीच कमकुवत झालेल्या लोकशाहीलाही धोका निर्माण होईल.
या पद्धतीच्या राजकारणामुळे इम्रान खान यांचा पक्ष फोडण्याचे प्रयत्न होत आहेत. याद्वारे नवीन गट तयार करण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.