नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा कडक निर्बंध लादले जाऊ शकतात. या संदर्भात भारत सरकारने राज्यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कठोर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. देशात कोरोना विषाणूच्या Omicron प्रकाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ही प्रकरणे 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
राज्यांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, “ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा किमान 3 पट जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे, त्याहूनही अधिक दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, गतिमान निर्णय घेणे आणि स्थानिक आणि जिल्हा स्तरावर कठोर आणि त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक आहे. देशाच्या विविध भागात आजही डेल्टा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता त्यांनी राज्यांना निर्बंध आणि पाळत ठेवण्यास सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या एका आठवड्यात चाचणी पॉजिटिव दर 10 टक्के किंवा त्याहून अधिक आहे आणि ऑक्सिजन समर्थित किंवा ICU बेड 40 टक्के किंवा त्याहून अधिक भरले आहेत त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि निर्बंध असावेत. राज्यांना कंटेनमेंट, चाचणी आणि पाळत ठेवणे, क्लिनिकल व्यवस्थापन, लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉल यासंबंधी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आता तर दररोज 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातील राज्यांतही कोरोनाचा वेग वाढला आहे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यात परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. तामिळनाडू मध्ये आजही 23 हजारांपेक्षा जास्त तर राजधानी चेन्नई शहरात 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या वाढत चाललेल्या कोरोनास काही प्रमाणात अटकाव व्हावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यात एक दिवसाच्या संपूर्ण लॉकडाऊनची घोषणाच केली आहे.
राज्य सरकारने 23 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय येथील सरकारने घेतला आहे.