Gold : मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी घसरण झाली. राजधानी दिल्लीत (Delhi) आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 764 रुपयांनी घसरून 52,347 रुपयांवर आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 53,111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भाव आज 1,592 रुपयांनी घसरून 58,277 रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 59,869 रुपयांच्या पातळीवर होता. जागतिक बाजारात सोन्याच्या (Gold) किमतीत घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर चांदीच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही.
स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) सोमवारी सराफा बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्याआधी शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) नोंदवले आहे, की आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस $ 1,775 वर कमी झाली आहे. त्याच वेळी चांदीचा भाव 20.13 डॉलर प्रति औंसवर होता. दुसरीकडे, देशांतर्गत स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याचाही परिणाम सोन्या चांदीच्या दरावर होताना दिसत आहे.
तसे पाहिले तर आपल्या देशात सोन्याला कायमच मागणी असते. सण उत्सवाच्या काळात तर ही मागणीच आणखीच वाढते. त्यासाठी नेहमीच दुसऱ्या देशांकडून सोने आयात (Gold Import) करावी लागते. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत सोने चांदीच्या दरावर परिणाम होतो. जागतिक बाजार सोने आणि चांदीचे दर कमी किंवा जास्त झाले तर त्यानुसार देशांतर्गत बाजारपेठेतील दर निश्चित होतात. मध्यंतरी कोरोना (Corona) काळात सर्वकाही ठप्प होते. त्यावेळी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोन्याने तर 56 हजारांचाही टप्पा पार केला होता. कारण, या काळात लोकांनी सुरक्षित गुंतवणूक (Investment) म्हणून सोने खरेदी केली होती. त्यामुळे या काळात सोन्याची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम दरवाढीत दिसून आला. आता मात्र तशी परिस्थिती नाही. तरी देखील सोन्याचे भाव फारसे कमी झालेले नाहीत.