Laxman Hake : अर्र.. तर लाखो मराठ्यांचे आरक्षण जाणार..? हाके यांच्या मागणीमुळे मराठा समाजात अस्वस्थता

Laxman Hake : राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनेकांनी आरक्षणासाठी आपले प्राण देखील दिले आहेत. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन्ही समाजाच्या आरक्षणामुळे राज्य सरकारला चांगलाच घाम फुटला आहे.

लक्ष्मण हाके यांनी 13 जूनपासून उपोषण सुरू केले असून राज्य सरकार जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाशी छेडछाड करणार नाही, असे आश्वासन देत नाही तोपर्यंत आपण आपले उपोषण सोडणार नाही, असे हाके यांनी स्पष्ट केले आहे. अशातच आता हाके यांनी मोठी मागणी केली आहे, यामुळे लाखो मराठ्यांचे आरक्षण जाणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

नुकतीच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का देखील लावणार नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. यावर हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सरकारने मराठा समाजाला दिलेल्या ५४ लाख नोंदी बोगस आहेत. त्यामुळे या नोंदी रद्द कराव्यात, नव्याने कोणतेही ‘कुणबी’ प्रमाणपत्र देऊ नका, “अशी मोठी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामागे बोलावता धनी कोण असेल याबद्दल चर्चा होत आहे. तसेच या मागणीमुळे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक होणार, हे निश्चित आहे. हाके यांची ही मागणी मान्य झाल्यास मग लाखो मराठा-कुणबी प्रमाणपत्र धारकांना धक्का बसणार आहे.

दरम्यान, हाके यांच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनजय मुंडे, भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर या ओबीसी नेत्यांसह स्थानिक ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. एकूणच दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेऊन सरकारची डोकेदुखी वाढवण्यात आलेली आहे. यावर तातडीने तोडगा काढून राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता अनेकजण सोशल मिडियाद्वारे करत आहेत.

Leave a Comment