Bihar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) 2024 सालच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत की नाही याबाबत जेडीयूने (JDU) महत्त्वाचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, पण विरोधी पक्षांना वाटत असल्यास पर्याय होऊ शकतात असे जेडीयू अध्यक्ष लालन सिंह यांनी म्हटले आहे. जेडीयूमधून नितीश केंद्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. याआधी नितीश कुमार आणि पक्षाचे प्रमुख नेते यासंबंधीचे प्रश्न टाळत होते . बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यापासून नितीश कुमार लवकरच बिहारमधील (Bihar) सरकारची कमान आरजेडीकडे (RJD) सोपवू शकतात आणि त्यानंतर ते पंतप्रधानपदासाठी दावा करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नितीश कुमार यांनी अलीकडेच भाजपबरोबर (BJP) युती तोडली आणि बिहारमध्ये आरजेडीबरोबर सरकार स्थापन केले. तरीही ते पूर्वीप्रमाणेच मुख्यमंत्री राहिले आहेत. तर राजद नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्याकडे पंतप्रधानपदाची पूर्ण क्षमता असल्याचे तेजस्वी यांनी आधीच सांगितले आहे.
दरम्यान, देशात सध्या भाजप बळकट आहे. अनेक राज्यात सरकार आहे. तसेच या सरकारला सध्यातरी कोणताही पर्याय दिसत नाही. विरोधी पक्षांकडून आव्हान देण्याचा प्रयत्न होत असला तरी मुख्य अडचण म्हणजे विरोधी पक्ष काही केल्या एकत्र येत नाहीत. याआधी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व पक्षांच्या संमतीने पंतप्रधानपदासाठी उमेदवार निश्चित करणे अशक्यच दिसत आहे. तरी देखील प्रादेशिक पक्षांतील काही नेते मंडळी तसा प्रयत्न करताना दिसतात. बिहारमध्ये भाजपला सत्तेतून बाहेर केल्यानंतर आता पुन्हा नितीश कुमार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेतले जात आहे. तसे संकेतही देण्यात येत आहेत. मात्र, यावर बाकीच्या विरोधी पक्षांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या काय धोरण आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.