Bihar : जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) बिहारमधील (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारमधील नवीन मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. याआधी कुशवाह यांचे नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र नंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे त्यांचे नाव वगळण्यात आले. त्यानंतर ते पाटण्याहून दिल्लीला गेले. ते सध्या राष्ट्रीय राजधानीत असून मंगळवारी पाटणा (Patana) येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार नाहीत.
जेव्हापासून नितीशकुमार यांनी एनडीएशी (NDA) संबंध तोडून महाआघाडीशी हातमिळवणी केली तेव्हापासून उपेंद्र कुशवाह यांनाही नव्या मंत्रिमंडळात जागा मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. कुशवाह यांनाही यावेळी आपण मंत्री होणार हे नक्की वाटत होते. मात्र अचानक नेतृत्वाने त्यांचे नाव यादीतून वगळले. नाव नसल्यामुळे उपेंद्र कुशवाह संतापले असून त्यामुळे ते दिल्लीला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षात उपेंद्र कुशवाह यांच्याबाबत पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा पक्ष आरएलएसपी (RLSP) जेडीयूमध्ये (JDU) विलीनीकरण करून त्यांची संसदीय मंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली. जेडीयूमध्ये उपेंद्र यांच्या वाढत्या उंचीमुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. तूर्तास उपेंद्र यांना संघटनेतच काम करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, मंत्रिमंडळात त्यांना मंत्रीपदी संधी मिळेल असे वाटत होते. परंतु, पक्ष नेतृत्वाने सध्या तरी तसा विचार केलेला नाही. या घडामोडींमुळे कुशवाह नाराज झाले असून ते आता शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत. एकूणच नव्या सरकारला हा पहिला झटका ठरणार आहे. यानंतर सरकारची पुढील वाटचाल कशी राहणार, नाराज नेते मंडळींचे मन वळविण्यात यश येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.