नवी दिल्ली : राजधानी दिल्ली शहरात प्रदूषण अत्यंत घातक होत चालले आहे. हे संकट कमी करण्यासाठी सरकारकडून कोणतेच ठोस निर्णय घेतले जात नाहीत. तसेच राज्य सरकारनेही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या घातक वातावरण राहावे लागत आहे. आता तर निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे या जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता अजूनही श्वास घेण्यास योग्य नाही. हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिला. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, आज गुरुवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 335 (अत्यंत खराब) श्रेणीवर नोंदवला गेला आहे. याआधी बुधवारी दिल्लीतील हवा ‘खूप खराब’ श्रेणीत राहिली. दिल्लीतील आठ भागातील हवा ‘गंभीर’ श्रेणीत राहिली. पुढील तीन दिवस प्रदूषणाची पातळी याच्या आसपास राहील, असा SAFAR चा अंदाज आहे. दिल्लीतील जनतेला सतत प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) जारी केलेल्या एअर क्वालिटी वृत्तानुसार, बुधवारी दिल्लीचा AQI 365 होता. हवेची ही पातळी अत्यंत खराब श्रेणीत ठेवली जाते. आदल्या दिवशी तो 369 होता. त्यात 24 तासांत चार अंकांची घट झाली आहे. दिल्लीतील आठ भागांचा AQI गंभीर श्रेणीत राहिला, म्हणजे 400 च्या पुढे. दिल्लीच्या हवेत सध्या सामान्यपेक्षा तिप्पट प्रदूषण आहे. CPCB नुसार, संध्याकाळी 5 वाजता पीएम 10 ची पातळी 319 आणि पीएम 2.5 पातळी 179 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती.
तर एनसीआर शहरांमध्ये फरीदाबादचा AQI 333, गाझियाबाद 352, ग्रेटर नोएडा येथे 404, गुरुग्राम 333 आणि नोएडा येथे 326 नोंदवला गेला. ग्रेटर नोएडाचा AQI गंभीर श्रेणीत राहिला तर इतर ठिकाणांचा AQI अत्यंत खराब श्रेणीत होता. सफर इंडियाच्या म्हणण्यानुसार, यावेळी वाऱ्याचा वेग कमी होत असून तापमानात घट होत आहे. त्यामुळे प्रदूषक कणांचे विसर्जन अतिशय संथ गतीने होत आहे. पुढील दोन-तीन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दिल्लीतील जनतेला प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
- वाचा : अर्र.. दिल्ली नाही तर ‘ही’ शहरे आहेत सर्वाधिक प्रदूषित; पहा, किती शहरांत प्रदूषण ठरतेय धोकादायक
- प्रदूषणाचा धोका वाढला..! ‘तो’ त्रास टाळण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या..