New Company Registration : देशात नव्या कंपन्यांच्या नोंदणीत (New Company Registration) सातत्याने वाढ होत आहे. मागील मे महिन्यातच 17 हजारांपेक्षा जास्त नव्या कंपन्यांची नोंदणी झाली. म्हणजेच दर दिवशी 550 नव्या कंपन्यांची नोंदणी झाली असे म्हणता येईल. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 33 हजार 600 पेक्षा जास्त नव्या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. कॉर्पोरेटसंबंधित कामकाज मंत्रालयाने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार देशात उद्योग विश्व सातत्याने विस्तारत आहे. एप्रिलमध्ये एकूण 16 हजार नव्या कंपन्यांची नोंदणी झाली होती.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात नोंदणी झालेल्या सर्व कंपन्यांचे एकूण भांडवल 722 कोटी रुपये इतके आहे. मे महिन्यात नोंदणी झालेल्या कंपन्यांमध्ये 900 कंपन्या कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची संख्या 2 हजार 480 इतकी आहे. उत्पादन क्षेत्राशी निगडीत 2 हजार 600 नव्या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. रियल इस्टेट, निर्माण, ट्रेडिंग, वित्त, दूरसंचाल या क्षेत्रात नव्या कंपन्यांची एन्ट्री झाली आहे.
आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते नव्या कंपन्यांच्या संख्येत वाढ होणे हे चांगले संकेत आहेत. यामुळे उद्योग क्षेत्र विस्तारण्यास मदत होते. देशात रोजगारातही वाढ होते. इज ऑफ डुइंग बिजनेस, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, पीएलआय योजनांसह काही प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यांमुळे कंपनी नोंदणी करून व्यवसाय सुरू करणे आधिक सोपे झाले आहे.
देशात 15 लाखांपेक्षा जास्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या नोंदणीकृत आहेत. यामध्ये एक तृतीयांश कंपन्या व्यापार सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत. 13 टक्के कंपन्या ट्रेडिंग संबंधित आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत सर्वाधिक ट्रेडिंग कंपन्या आहेत. सरकारकडून वेळोवेळी या कंपन्यांची तपासणीही केली जाते. या तपासणीत कंपन्या निष्क्रिय आढळल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की कंपनीच्या रुपात नोंदणी केल्यानंतर कंपनीच्या प्रवर्तकांना बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होते. अनेक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंपनीची नोंदणी होते. ज्यामुळे बँकेलाही जास्त आणि आवश्यक कागदपत्रे मिळणे सुलभ होते.