NEET Exam Scam : नीट परीक्षा घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन, एकाला अटक; अनेक चर्चांना उधाण

NEET Exam Scam : गेला काही दिवसांपासून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट परीक्षा घोटाळ्या संबंधात एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, हा शिक्षक सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील रहिवासी असून लातूरमध्ये शिकवत आहे. त्यामुळे माढातही आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, या घोटाळ्याच्या प्रकरणात पोलिसांनी संजय तुकाराम जाधव या शिक्षकाला अटक केली आहे. सध्या तो माढा तालुक्यीतील टाकळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत मात्र त्याने या शाळेवर पोटशिक्षकाची नियुक्ती करत लातूरमध्ये क्लासेस घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांवर गुन्हा दाखल केला असून आणखी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणात अटकेत असलेला जलील पठाण याला 2 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

तर धाराशिवमध्ये आयटीआय सुपरवायझर असलेला इरना कोनगलवार आणि दिल्लीचा गंगाधर मुंडे या आरोपींचा देखील पोलीस शोध घेत आहे.

आतापर्यंतच्या कारवाईत पोलिसांनी जलील पठाण आणि संजय जाधव या आरोपींकडून मोबाईल सेटसह काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात नेटचा पेपर लीक करण्यात आला असून त्यापैकी 50 हजार रुपये ॲडव्हान्स देण्यात आले होते. 

नीट परीक्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर सरकारने ही परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment