NCP crisis । मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतात. यामुळे अनेकदा राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणाला जाते. अशातच आता राज्यात पुन्हा सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? असा सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारला असता त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “वाईट काळात जे सोबत राहिलेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या निर्णयाबाबत शरद पवारांनी सांगितलं आहे. शरद पवार यांना जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या परतीबद्दल माझ्यात आणि शरद पवार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. गेलेले ते परत येतील असं मला वाटत नाही. पण जरी आले तर त्याबद्दल चर्चा करू,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की हे योग्य आहे. मला इतकेच वाटतं की हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलं नाही. पुन्हा आपण निवडून येणार नाहीत, अशी शंका त्यांना आली असावी. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने पाहिजे तशा घोषणा त्या पुढच्या काही दिवसांत करतील. महावितरण कंपनीला डुबवून शेतकऱ्यांना वीज बिल माफ संदर्भात कितीही मोठी घोषणा केली तरी त्याचा आता उपयोग होणार नाही,” अशी जहरी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
तसेच जयंत पाटील यांनी शरद पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीबद्दलही मोठे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची का भेट घेतली याबाबत माझी शरद पवारांसोबत चर्चा झालेली नाही. सत्तेत बसणाऱ्या लोकांनी दोन्ही बाजूला काय आश्वासन दिले त्यानुसार निर्णय घ्यावा. आरक्षणाच्या प्रश्नाकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही,” असेही जयंत पाटलांनी स्पष्ट केले.