NCP Crisis : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाली आहे. विधानसभेपूर्वी महायुतीतील अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत.
विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं भगदाड पडलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आगामी 20 तारखेला हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असेल. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांना बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा धक्का बसत आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्यामुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं. पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत आहेत.
”माझ्या संपर्कात कोणीही नाही. मी त्याच्यात लक्षही देत नाही. जयंत पाटील यांना ते लोक भेटतात, याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचे मतदान झाल्यावर आपल्याला समजेल,” अशी माहिती शरद पवार यांनी पक्षात येऊ इच्छुक असणाऱ्यांबद्दल दिली आहे.