Rahul Gandhi : कर्नाटकात निवडणुकीचा प्रचार (Karnataka Elections) शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसही आश्वासनांची खैरात करण्यात मागे नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्याचा फायदा राज्यातील अर्ध्या लोकसंख्येला होणार आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी राज्यातील सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी यांनी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. काँग्रेसने निवडणूक हमी पाळली नसल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस पक्ष आपली आश्वासने पूर्ण करणार नाही. आम्ही तुम्हाला चार हमी दिल्या आहेत आणि पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांची अंमलबजावणी होईल. मोदीजी, तुम्ही म्हणालात की चार हमी पूर्ण होणार नाहीत, मी अजून जोडत आहे. पहिल्या दिवशी आम्ही चार नव्हे तर पाच हमींची पूर्तता करू.
राहुल गांधी म्हणाले की, सध्याच्या चार आश्वासनांमध्ये आम्ही आणखी एक आश्वासन जोडू. हे महिलांसाठी असेल. काँग्रेस सत्तेवर येण्याच्या पहिल्याच दिवशी लागू केले जाईल, ज्याअंतर्गत महिला संपूर्ण कर्नाटकात सार्वजनिक वाहतूक बसमधून मोफत प्रवास करतील.
तुमच्या (भाजप) लोकांनी 40 टक्के कमिशनच्या माध्यमातून पैसा लुटला, हे तुमचे काम आहे, तर आमचे काम राज्याच्या पैशाचा फायदा कर्नाटकच्या महिलांना देण्याचे आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक जिंकल्यानंतर महिलांसाठी बसमधून प्रवास मोफत केला जाईल.
उल्लेखनीय आहे की, काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक हमीमध्ये गृहज्योती योजनेंतर्गत दरमहा २०० युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक प्रमुख महिलेला दरमहा २,००० रुपये आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला’अन्न भाग्य’ अंतर्गत दरमहा 10 किलो तांदूळ देण्यात येईल.
याशिवाय युवा निधी अंतर्गत बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना 1,500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत.