Prashant Kishor on Congress : 2024 मध्ये कर्नाटक विधानसभेतील विजयाचा (Karnataka Election) काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकच्या विजयाने 2024 मध्ये काँग्रेस (Congress) पक्षाची कामगिरी सुधारेल याची शाश्वती नाही.
बिहारमध्ये आयपीएसीने सुरू केलेल्या जन सूरज मोहिमेअंतर्गत त्यांचे हे वक्तव्य आले आहे. 2013 मध्येही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळवला होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा भाजपकडून पराभव झाला होता, याची आठवण त्यांनी सांगितली.
काय म्हणाले प्रशांत किशोर ?
प्रशांत किशोर म्हणाले की, 2014 नंतर 2019 मध्येही देशातील सर्वात मोठा पक्ष लोकसभा निवडणुकीत हरला. कर्नाटकातील विजयाबद्दल मी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो. पण मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सावध करू इच्छितो की त्यांनी विधानसभेसारख्या चुका करू नयेत. अन्यथा 2024 मधील विजय अधिक कठीण होईल.
प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये राज्यव्यापी पदयात्रा केली आहे. प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संभाव्यतेवर वक्तव्य केले आहे. 2012 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएने लोकसभेच्या 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या, अशी आठवण प्रशांत यांनी सांगितली.
त्याचप्रमाणे 2013 च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र, पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
ते पुढे म्हणाले की, 2018 मध्ये काँग्रेस पक्षाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. 45 वर्षीय प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, जगनमोहन रेड्डी यांसारख्या राजकारण्यांसाठी प्रचार केला आहे. प्रशांत किशोर यांनी 2021 मध्ये प्रचार थांबवला. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी प्रचार केला आणि मोठा विजय मिळवला.