Anil Antony Joins BJP : केरळमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यात काँग्रेसचे (Congress) मोठे नुकसान होणार आहे. तर दक्षिणेत आपली स्थिती मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला बळ देणारे ठरणार आहे. ए. के. अँटनी हे काँग्रेसचे निष्ठावंत समजले जातात. मात्र तरी देखील त्यांना आपल्या मुलाचा भाजपातील प्रवेश रोखता आला नाही.
भाजपात प्रवेश करण्याआधी अनिल अँटनी काँग्रेसच्या सोशल मिडीयाचे काम पाहत होते. ज्यावेळी बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक डॉक्यूमेंट्री प्रसिद्ध केली होती. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत बीबीसीचा केलेला हा प्रकार पक्षपातपूर्ण असल्याचे म्हटले होते. त्यांनी केलेले हे वक्तव्य काँग्रेसमधील अनेकांना पटले नव्हते.
मात्र तरीही कोणतीही भीती न बाळगता त्यांनी आपले विचार बोलून दाखवले होते. यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच त्यांनी आज भाजपात प्रवेश करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अनिल यांनी बीबीसीच्या वादानंतर तीव्र विरोध व्यक्त केला होता आणि काँग्रेससोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला होता. अनिल अँटनी यांना केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी भाजप मुख्यालयात नेले आणि तेथे त्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. अनिल अँटनी यांच्या पक्ष प्रवेशावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही. मुरलीधरन आणि पक्षाच्या केरळ युनिटचे प्रमुख के. सुरेंद्रन उपस्थित होते.
बीबीसीच्या माहितीपटावर ट्विट केले
सदस्यत्व घेतल्यानंतर अनिल अँटनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एका कुटुंबासाठी काम करतो असा विश्वास आहे. पण, मी काँग्रेससाठी काम करत होतो यावर माझा विश्वास आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने मी खूप प्रभावित झालो आहे. अनिल अँटोनी यांनी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) च्या सोशल मीडिया समन्वयक पदाचा राजीनामा दिला होता. पीएम मोदी आणि गुजरात दंगलीवर बनवलेल्या बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटावर त्यांनी एक ट्विट केले होते, त्यानंतर पक्षात वाद निर्माण झाला होता.
अनिलच्या निर्णयाने दुखावलो – एके अँटनी
अनिल यांच्या भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याच्या निर्णयाने मी दुखावलो आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी सांगितले. त्याचा हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. भारताचा आधार एकता आणि धार्मिक सलोखा आहे. 2014 नंतर देशातील विविधता आणि धर्मनिरपेक्षता कमकुवत झाली आहे. अनिल यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाने माझे मन दुखावले आहे.