Nana Patole । विधानसभेबाबत नाना पटोलेंनी केली मोठी घोषणा; म्हणाले, “मविआच्या नावावर आम्ही…”

Nana Patole । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष राज्यातअव्वल क्रमांकाचा पक्ष ठरला . विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये मागील दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढणाची तयारी सुरू केली आहे, अशी चर्चा सुरु आहे.

काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक चर्चा केली असून ज्या जागा काँग्रेसला सुटतील त्यावर आम्ही संपूर्ण ताकदीने लढणार आहोत. तसेच महाविकास आघाडीच्या नावावर विधानसभा निवडणूक लढणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुढे नाना पटोले म्हणाले की, “शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिनचीट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून आणखी एकाला स्वच्छ करून घेतले असल्याचे आणखी एक उदाहरण आहे. मोदी सरकार हे ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले असून वायकर त्यातीलच एक प्रकरण आहे.”

“राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे. राज्याचे गृहमंत्री हे फक्त घोषणा करतात कृती पण काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आरोपींना पंचतारांकित सुविधा देण्यात येत आहे. नागपूरमध्येही मद्यधुंद महिला कारचालकाने दोन तरुणांना कारखाली चिरडले. ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आरोपींना जामीन मिळाला. धनाढ्य घरातील आरोपींना कसलीच भीती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याच्या प्रयत्न करण्याची हिंमत होते, असे पटोले म्हणाले.

Leave a Comment