Mumbai Marine Drive मुंबई : देशाची आर्थिक राजधानी (financial capital of the country) म्हणजे मुंबई आणि मुंबईला फिरायला गेल्यावर सगळ्यात भारी अनुभव देणारा रस्ता म्हणजे मरीन ड्राइव्ह. त्यामुळेच या ठिकाणाला एक पर्यटनदृष्ट्या खूप महत्व आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली येथील मास्टर ऑफ डिझाईन विषयाचा विद्यार्थी राहिलेला आणि पुण्यात राहणाऱ्या डिझाइनर, शोधक अभियंता पराग (Parag, Master of Design at Indian Institute of Technology (IIT) Delhi and lives in Pune) यांनी याबाबत क्वॉरा यावर चांगली माहिती दिली आहे. आतापर्यंत किमान ३ लाख वाचकांनी हे वाचलेले आहे.
पराग लिहितात की, मरीन ड्राईव्ह प्रमाणेच जगभरात बहुतेक समुद्र किनारी आपण जे कॉंक्रिटचे ठोकळे पाहतो त्याचा उद्देश हा मुख्यत्वेकरून समुद्रकिनाऱ्यांची धूप कमी करणे हा आहे. तसेच याचा उपयोग समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी केला जातो. समुद्राच्या लाटांत प्रचंड शक्ती असते. अशा लाटा जेव्हा समुद्रकिनाऱ्यांवर येऊन आपटतात तेव्हा प्रचंड शक्तीचे हस्तांतरण होते. या शक्तिशाली माऱ्यामुळे समुद्रतटांची वेगाने झीज होते. काही ठिकाणी समुद्रतटालगत मानवनिर्मित बांधकामेही केलेली असतात. उदाहरण म्हणून आपले मुंबईचे मरिन ड्राईव्ह आहे. यासह बुर्ज-अल-अरब जुमेराह (Burj-al-Arab Jumeirah) सारखे मानवनिर्मित बेटावर बांधलेले पंचतारांकित हॉटेल हेही गुगलवर पाहायला मिळते.
तर ते पुढे लिहितात, समुद्राच्या शक्तिशाली लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे अशा बांधकामांना हानी पोहोचण्याचा धोका संभवतो. परिणामी ही बांधकामे लवकर कमकुवत होऊन त्यांचे आयुष्यमान कमी होते. म्हणून अशावेळी लाटांच्या माऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काँक्रीटच्या विविध आकारातील ठोकळ्यांचा उपयोग केला जातो. यांच्या टेट्राहेड्रल (चार पायाचा) आकारामुळे यांना हे असे नाव पडले. टेट्रापॉड्स १९५० मध्ये फ्रान्समध्ये विकसित करण्यात आले. त्यांच्या प्रभावी उपयोगीतेमुळे ते आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत. जपानचा जवळपास पन्नास टक्के समुद्रतट टेट्रापॉड्स वापरून संरक्षित केलेला आहे. टेट्रापॉड्सच्या विशिष्ट आकारामुळे ते एकमेकांत घट्ट बसतात. या डिझाईनमुळे जेव्हा लाटांचा मारा त्यांच्यावर पडतो तेव्हा ते पाण्याला चहूबाजूला पसरवतात. त्यामुळे लाटांच्या शक्तीची ताकद बऱ्याचअंशी कमी होते. वजन आणि विशिष्ट आकार यामुळे अत्यंत तीव्र हवामानातही ते आपल्या जागी स्थिर राहतात.
यासह आणखी एक प्रकार पराग यांनी सांगितला आहे. पुढे ते लिहितात की, छिद्रित कॉंक्रिट ब्लॉक असाही एक पर्याय आहे. या प्रकारच्या ठोकळ्यांचा उपयोग सर्वप्रथम बुर्ज-अल-अरब जुमेराह या दुबई मधल्या पंचतारांकित हॉटेलच्या निर्मितीमध्ये करण्यात आला आहे. हे हॉटेल समुद्रकिनाऱ्यापासून थोडे आत एका मानवनिर्मित बेटावर स्थित आहे. अशावेळी लाटांच्या माऱ्याने बेटाची धूप होऊन हॉटेलला धोका निर्माण होऊ नये म्हणून यांचा वापर केला गेला आहे. यामध्ये एकावर एक रचलेले असे छिद्रित ठोकळे एखाद्या विशालकाय स्पंजप्रमाणे काम करतात. जेव्हा समुद्राच्या शक्तिशाली लाटा येऊन किनाऱ्यावर आपटतात तेव्हा लाटांचे हे ताकदवान पाणी ठोकळ्यांमधील छिद्रातून आत शिरते. ठोकळ्याच्या विशिष्ट संरचनेमुळे आत शिरलेले पाणी गोलाकार दिशेने फिरून त्याचा वेग मंदावतो. अशा प्रकारे लाटांची शक्ती प्रचंड प्रमाणात कमी होते व संभाव्य नुकसान टळते. याखेरीज अन्य काही आकाराच्या ठोकळ्यांचा वापरही काही ठिकाणी केला जात असला तरी त्यांचा उद्देश हा एकाच आहे तो म्हणजे लाटांच्या माऱ्यापासून किनाऱ्याचे आणि किनाऱ्यालगतच्या बांधकामांचे रक्षण करणे.