Mulayam Singh Yadav Death : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) जेष्ठ नेते तथा संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये (Medanta hospital) मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. २ ऑक्टोबर रोजी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मुलायमसिंह यादव यांच्या जाण्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मुलायम सिंह यादव यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
मुलायम सिंह यांनी कायमच देशहिताचा विचार केल्याचं नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्वीटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी मुलायम सिंह यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यासमवेत काही फोटो ट्वीट केले आहेत. “मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आणीबाणीच्या कालावधीमध्ये ते लोकशाहीसाठी लढणारे महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक होते. संरक्षणमंत्री (Defence Minister) म्हणून त्यांनी सक्षम भारत घडवण्यासाठी काम केलं,” असंही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. ट्वीटला दिलेल्या कॅप्शनमध्ये मोदींनी आणीबाणीपासून ते मुलायम सिंह यादव संरक्षणमंत्री असेपर्यंतचा उल्लेखही केला आहे.
Mulayam Singh Yadav Ji distinguished himself in UP and national politics. He was a key soldier for democracy during the Emergency. As Defence Minister, he worked for a stronger India. His Parliamentary interventions were insightful and emphasised on furthering national interest. pic.twitter.com/QKGfFfimr8
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2022
अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग असलेल्या मुलायम सिंह यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी आतापर्यँत तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) पद भूषवलं होत. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला होता.
उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंह यादव यांच्या निधनांतर तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे पार्थिव सैफई येथे नेण्यात येणार आहे.