पुणे : चित्रपटात दहशतवादी नथुराम गोडसे याची भूमिका केल्याने चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध आज तरुणांनी गांधीगिरी आंदोलन करून लक्ष वेधले. पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोंडस नावाखाली खासदार कोल्हे यांची पाठराखण केली आहे. त्याचवेळी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यातील विचारी तरुणांनी गांधीगिरी आंदोलन करून अमोल कोल्हे यांनी देशाची माफी मागण्याचे आवाहन केले.
याबाबत दोन दिवसांपूर्वी हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण यांनी आपली भूमिका जाहीर करताना म्हटले होते की, नेते – अभिनेते डाॅक्टर अमोल कोल्हे यांनी दहशतवादी नथुरामचे उदात्तीकरण व गांधीजींची बदनामी केल्यामुळे समाजातील विविध नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. हे हीन कृत्य केल्याबद्दल कोल्हे यांनी देशाची आजवर माफी देखील मागितलेली नाही. त्यामुळे आजारी कोल्हे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी काही पुस्तके, गांधीजींची प्रतिमा, गुलाबाची फुले कोल्हे यांना उद्या भेट देत आहोत. सविनय पद्धतीने प्रजासत्ताकदिनी उद्या नारायणगाव येथे जाऊन हा उपक्रम राबवत आहोत. आपणही सर्व नथुरामचे उदात्तीकरण करणार्या आजारी लोकांना गुलाबाची फुले द्या. महात्मा गांधीजींचा विजय असो! नथुराम गोडसे मुर्दाबाद!!!
त्यानुसार आज हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण यांनी खासदार कोल्हे यांचे घर आणि कार्यालयात जाऊन आंदोलन केले. याबाबत आज सकाळी हर्षल लोहकरे यांनी फेसबुकवर लिहिले की, प्रजासत्ताकदिनानिमीत्त राजगुरुनगर येथे महान क्रांतीकारक शहीद ए आझम भगतसिंह, शिवराम हरी राजगुरु व सुखदेव थापर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून हुतात्मा क्रांतीकारक बाबू गेनू सैद यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यासाठी मार्गस्थ झालो. त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, अमोल कोल्हे घरी नसल्याने त्यांच्या कार्यालयात आंदोलन केले. याबाबत फेसबुक लाइव्ह करून तरुणांनी आपली भूमिका जाहीर केली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोलन चालू होते. खासदार कोल्हे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष याबाबत आता काय उत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.