Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) रात्री उशिरा आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे (Morocco Earthquake) आतापर्यंत तब्बल 820 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 600 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, देशाच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, ‘भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी मोजली गेली आहे.’
भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंप रात्री 11:11 वाजता मार्राकेशच्या नैऋत्येस 44 मैल (71 किलोमीटर) 18.5 किलोमीटर खोलीवर आला. स्पेक्टेटरच्या मते, मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत किमान 329 जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान मोदींकडून संवेदना व्यक्त
आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी लिहिले, ‘मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे खूप दुःख झाले. या दुःखाच्या वेळी माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी शोक. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7 होती
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला. मोरोक्कोच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि चेतावणी नेटवर्कने रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 एवढी मोजली, तर यूएस एजन्सीने भूकंपाच्या 19 मिनिटांनंतर 4.9 तीव्रतेचा भूकंप नोंदवला. मोरोक्कन लोकांनी अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यामध्ये काही इमारती कोसळताना दिसत आहेत. या भूकंपात शेकडो घरांचे नुकसानही झाले आहे.