IMD Alert : राज्यात मान्सून सुरू होण्यापूर्वी हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. यामुळे काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी उष्णेतीची लाट आली आहे.
यातच भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, या आठवड्याच्या शेवटी मुंबईत हवामान बदलेल. आयएमडीने शहर आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज नैऋत्य मोसमी पावसाने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीव प्रदेशाचा आणखी काही भाग, लक्षद्वीप प्रदेशाचा काही भाग, संपूर्ण कोमोरिन प्रदेश, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि आणखी काही भागांवर प्रगती केली आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकले.
मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा वेग असाच सुरू राहिल्यास तो 4 ते 7 जून दरम्यान केरळला कधीही धडकू शकतो. तर 15 जूनपासून मुंबईत मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो.
मुंबईत पावसामुळे पारा घसरणार
अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे केरळ आणि पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनच्या सुरुवातीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, मुंबईसह समुद्रकिनाऱ्यालगतच्या कोकण पट्ट्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने चिकट उष्णता जाणवत आहे.
शुक्रवारी सकाळी मुंबईत 70 टक्के आर्द्रतेसह 30.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. आपल्या अंदाजात, IMD ने म्हटले आहे की 8 जूनपर्यंत मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C राहण्याची शक्यता आहे. तर 3 आणि 4 जूनला म्हणजे वीकेंडला मुंबईत हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची उच्च संभाव्यता (51-75% संभाव्यता) आहे.
मान्सून कधी पोहोचणार
दक्षिणेकडील केरळ राज्यात साधारणत 1 जून रोजी मान्सून सुरू होतो. मात्र यंदा मान्सूनचा हंगाम 4 जूनच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. मान्सून 29 मे 2022, 2021 मध्ये 3 जून आणि 2020 मध्ये 1 जून रोजी दक्षिणेकडील राज्यात पोहोचला होता.
तर मान्सून साधारणत: 7 जूनच्या सुमारास दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करतो, तर 15 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यास सुमारे चार ते पाच दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे मान्सून साधारणपणे 10 जूनला दाखल होतो, पण यंदा तो विलंबाने 15 जूनपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, 10 जूननंतर मुंबईत मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे. पण मान्सून मुंबई आणि महाराष्ट्रात कधी दार ठोठावणार याच्या नेमक्या तारखा केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर कळणार आहेत.