‘त्यामुळे’ इलेक्ट्रिक वाहन कंपन्या सरकारच्या निशाण्यावर.. केंद्र सरकारने कंपन्यांना दिलाय ‘हा’ इशारा..
दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक आग (Fire) लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे आता इलेक्ट्रिक वाहन कंपन्या सरकारच्या निशाण्यावर आल्या आहेत. इलेक्ट्रिक दुचाकींना आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सरकार निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आवश्यक आदेश जारी करेल. अशा प्रकरणांमध्ये तज्ज्ञ समितीचा (Expert Committee) अहवाल आल्यानंतर सरकार आवश्यक ते आदेश जारी करेल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. इलेक्ट्रिक दुचाकींना लागलेल्या आगीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे.
ट्विटद्वारे गडकरी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे अनेक अपघात समोर आले आहेत. “आम्ही या घटनांचा तपास आणि प्रतिबंध करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. अहवालाच्या आधारे, आम्ही निष्काळजी कंपन्यांवर आवश्यक आदेश जारी करू. केंद्रीय मंत्री म्हणाले, की आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे जारी करू. कोणत्याही कंपनीने निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येईल आणि सर्व सदोष वाहने परत घेण्याचे आदेशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) ते प्युअर ईव्ही, ओकिनावा (Okinawa) या काही कंपन्यांच्या डझनभर इलेक्ट्रिक दुचाकींना गेल्या काही आठवड्यात आग लागली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये येणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती गरज पडल्यास आवश्यक सूचनाही देईल. इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Pure EV ने इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीमध्ये (Battery) स्फोट झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासह कंपनीने 2 हजार वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या इंधनाचे वाढत्या दरांमुळे लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा विचार सुरू केला होता. या वाहनांना हळूहळू मागणीही वाढत आहे. मात्र, आता अशा घटना घडू लागल्याने इलेक्ट्रिक वाहनांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारनेही आता या घटनांची दखल घेतली आहे.
पेट्रोलच्या किंमतीने हैराण..! ‘या’ आहेत देशातील शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या, हटके फिचर..