अर्र.. पगार वाढलाय खरा पण, फक्त 8 रुपये; ऐन महागाईच्या काळात सरकारने दिलाय झटका..
अहमदनगर : देशभरात सध्या महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. इंधनाचे भाव (Fuel Price) प्रचंड वाढले आहेत. या भाववाढीमुळे देशांतर्गत महागाईत मोठी वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ, भाजीपाल्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकार आणखी त्रासदायक निर्णय घेत आहे. सरकारने सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. वाढलेल्या महागाईचा कोणताही विचार न करता केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतील (Employment Guarantee Scheme) मजुरीच्या (Wages) दरात फक्त 8 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
सध्याच्या वाढत्या महागाईत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यातुलनेत रोजगार हमी योजनेत कष्टाची कामे करणाऱ्या मजुरांचा पगार वाढलेला नाही. यंदा मजुरांच्या मजुरीत फक्त 8 रुपये वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा केलेली वाढ कमीच आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या मजुरीचे नवीन दर जाहीर केले आहेत. आता राज्यातील मजुरांना 248 रुपयांऐवजी 256 रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दरवर्षी मजुरीचे दर जाहीर केले जातात. नव्या आर्थिक वर्षासाठीही दर जाहीर केले आहेत.
मात्र, यावेळी सरकारने फक्त 8 रुपये वाढ केली आहे. म्हणजेच राज्यातील रोजगार हमी योजनेवरील मजुरांना आता 248 रुपयांऐवजी 256 रुपये एका दिवसाला मिळणार आहेत. सरकारने हे मजुरीचे दर जाहीर करताना वाढलेल्या महागाईचा कोणताच विचार केल्याचे दिसत नाही. साधारण 5 वर्षांआधी 192 रुपये मजुरी दिली जात होती. त्यात 9 रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे यंदा सरकार मजुरीत चांगली वाढ करील, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सरकारने यावेळी सुद्धा हात आखडता घेतला आहे.
सन 2015 मध्ये 168 रुपये मजुरी मिळत होती. त्यानंतर यामध्ये 13 रुपये वाढ करण्यात आली. त्यानंतर पुढील वर्षात फक्त 11 रुपये वाढ केली गेली. 2017 मध्ये 9 रुपये वाढ करण्यात आली तर 2018 मध्ये फक्त 2 रुपये वाढ करण्यात आल्याने मजुरी 203 रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मागील वर्षात 248 रुपये मजुरी मिळत होती. आता या वर्षात 8 रुपये वाढ करण्यात आली. म्हणजेच आता मजुरांना 256 रुपये मिळणार आहेत.
काम की बात : पगार खात्याबाबत ‘हे’ माहित आहे का..? ; जाणून घ्या, काय मिळतात फायदे..?