दिल्ली : पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील (Pakistan) सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी देण्याचा नियम त्यांनी रद्द केला आहे. देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना आता एक दिवसाची सुट्टी मिळणार आहे. याशिवाय कार्यालयाच्या वेळाही सकाळी 10 ऐवजी 8 वाजता केल्या आहेत. त्यांचा हा निर्णय देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानमधील सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. शाहबाज शरीफ सकाळी 8 वाजता पंतप्रधान कार्यालयात पोहोचले.
शाहबाज शरीफ 8 वाजता पंतप्रधान कार्यालयात पोहोचले तेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. याबरोबरच यापुढे सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच वेळ राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय आता फक्त रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल, असेही ते म्हणाले. रेडिओ पाकिस्तानने म्हटले आहे की, ‘आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत आणि अशा परिस्थितीत एक मिनिटही वाया जाऊ नये.’ मात्र, यावेळी शाहबाज शरीफ यांनी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासाही दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ आणि किमान वेतन 25 हजार रुपये करण्याची घोषणा त्यांनी केली.
याशिवाय शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्याच दिवशी आर्थिक तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी देशासमोरील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना मागवल्या. दरम्यान, शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाबाबतही चर्चा सुरू आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील नावांवर लवकरच निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच काश्मीर (Kashmir) प्रश्नावर मोठे वक्तव्य केले होते. शहबाज शरीफ म्हणाले होती, की दुर्दैवाने आमचे भारताबरोबर चांगले संबंध असू शकले नाहीत. नवाज शरीफ यांना भारताबरोबर चांगले संबंध हवे होते. ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरमध्ये काय झाले, कलम 370 रद्द (Article 370 ) करण्यात आले. त्यानंतर आम्ही काही कार्यवाही केली का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
आम्हाला भारताबरोबर (India) चांगले संबंध हवे आहेत, पण काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय शांतता राखता येणार नाही. काश्मिरींसाठी आम्ही प्रत्येक मंचावर आवाज उठवू. राजनैतिक पातळीवर काम करेल. त्यांना पाठिंबा देणार आहोत. ते आमचे लोक आहेत. मी पंतप्रधान मोदींना सांगेन, की तुम्ही समजून घ्या की दोन्ही बाजूला गरिबी आहे, बेरोजगारी आहे. आपण आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे नुकसान का करू इच्छितो ? काश्मिरींच्या आकांक्षेनुसार काश्मीर प्रश्नाचा निर्णय घेऊ.
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे काश्मीरबाबत मोठे वक्तव्य; चीनचे केले कौतुक; जाणून घ्या..