सोदिल्ली : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 304 रुपयांनी वाढला तर दुसरीकडे आज चांदीचा भाव 508 रुपयांनी वाढला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 304 रुपयांनी वाढून 52,302 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,998 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 508 रुपयांनी वाढून 67,407 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 66,899 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ज्यामुळे देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) वर परिणाम होण्याची शक्यता आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती. भारतात सोन्याची आयात प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी केली जाते. 2021-22 या आर्थिक वर्षात हिरे आणि दागिन्यांची निर्यात जवळपास 50 टक्क्यांनी वाढून 39 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
दुसरीकडे, पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने आणि रसायने क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे देशाची वस्तू निर्यात 2021-22 या आर्थिक वर्षात $418 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्यापाराची आकडेवारी जाहीर करताना ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, 2021-22 या वर्षात भारताच्या कमोडिटी व्यापाराने (निर्यात आणि आयात) एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे कारण देशाची आयात देखील $610 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे.