मुंबई : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जबरदस्त झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 एप्रिलपासून एलपीजी टाकीच्या दरात एका झटक्यात 250 रुपयांनी वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ही वाढ केली आहे, घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांवर या दरवाढीचा तसा परिणाम होणार नाही. कंपन्यांनी 10 दिवसांआधी घरगुती एलपीजी टाकीच्या किमती 50 रुपयांनी वाढ केल्या होत्या, त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती स्वस्त झाल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या दरात अचानक वाढ करण्यात आली आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस टाकीची किंमत 250 रुपयांनी वाढल्याने दिल्लीत 19 किलो टाकी आता 2,253 रुपये झाली आहे. 1 मार्च 2022 रोजी येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर 2,012 रुपयांना भरला जात होता, जो 22 मार्चला किंमत कमी झाल्यानंतर 2,003 रुपयांपर्यंत खाली आला. आता मुंबईत व्यावसायिक गॅस टाकीचे दर 1,955 रुपयांऐवजी 2,205 रुपये झाले आहेत.
देशातील इतर शहरांमध्येही किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी 2,351 रुपयांना भरला जाईल जो आतापर्यंत 2,087 रुपयांना भरला जात होता. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस दर आता 2,138 रुपयांऐवजी 2,406 रुपयांवर पोहोचला आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या (2022-23) पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी सर्वसामान्यांना दुहेरी दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी आज ना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढ केल्या आहेत ना घरगुती LPG गॅसच्या दरात वाढ केली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ आता जास्त खर्चिक होणार आहेत. दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोचा एलपीजी टाकी 949.50 रुपयांना उपलब्ध आहे.
याशिवाय कोलकात्यात 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये मिळत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे एक हजाराच्या वर जाऊन 1,39.50 रुपये भाव मिळत आहे.
2022 च्या सुरुवातीला दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1 जानेवारीला 1,998.50 रुपये होता, जो 1 फेब्रुवारीला 1,907 रुपयांवर आला. मात्र, 1 मार्च रोजी त्यात पुन्हा वाढ होऊन दर 2,012 रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे 1 जानेवारी रोजी मुंबईत एक व्यावसायिक सिलिंडर 1,948.50 रुपयांना उपलब्ध होता. 1 फेब्रुवारीला तो 1,857 रुपयांवर घसरला आणि 1 मार्चला 1,963 रुपयांपर्यंत वाढला.
महागाईचा भडका : महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शिअल गॅस टाकीचे दर वाढले; वाचा किती वाढलेत दर