मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली दूरसंचार कंपनी Vodafone-Idea ने गुरुवारी जाहीर केले की त्यांच्या बोर्डाने इक्विटी जारी करण्यास आणि प्रवर्तक, प्रवर्तक गटाकडून निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. Vodafone-Idea प्रति शेअर 13.30 रुपये (रु. 3.30 प्रति शेअरच्या प्रीमियमसह) किंमतीवर शेअर जारी करेल. कंपनी सुमारे 4500 कोटी रुपये उभारणार आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन-आयडियाचा शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून 9.68 रुपयांवर बंद झाला.
व्होडाफोन-आयडियाने एका एक्सचेंज फाइलमध्ये म्हटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 3,38,34,58,645 इक्विटी शेअर्सच्या वाटपाचा विचार केला आहे आणि रोख रकमेसाठी 13.30 रुपये प्रति शेअर या किंमतीवर मंजुरी दिली आहे. त्याची किंमत सुमारे 4,500 कोटी रुपये आहे. कंपनीने तीन प्रवर्तकांना इक्विटी शेअर्स वाटप केल्याचे सांगितले आहे. 1966635,338 युरो पॅसिफिक सिक्युरिटीजला प्राधान्याच्या आधारावर वाटप केले आहे. त्याच वेळी, प्राइम मेटल्सला 570958646 इक्विटी शेअर्स आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट्सला 84,58,64,661 शेअर्स वाटप करण्यात आले आहेत.
कंपनीच्या भागधारकांनी 26 मार्च 2022 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विशेष ठरावाद्वारे मुद्दे मंजूर केले आहेत. कंपनीने म्हटले आहे, की इक्विटी समभागांच्या या वाटपानंतर व्होडाफोन-आयडियाचे पेड-अप इक्विटी शेअर भांडवल 3,21,18,84,78,850 झाले आहे, ज्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये असणारे 32,11,88,47,885 शेअर्स आहेत.
दरम्यान, आर्थिक संकटात अडकलेल्या व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. संकटाच्या काळात ग्राहक कंपनीपासून दूर जात आहेत. आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने तब्बल 19 लाख ग्राहक गमावले आहेत. ग्राहकांच्या बाबतीत कंपनीला गेल्या 5 महिन्यांतील हा सर्वात मोठा धक्का आहे. या 19 लाखांपैकी सुमारे 12 लाख ग्राहक ग्रामीण भागातील होते ज्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनी सोडली. याचे मुख्य कारण खराब नेटवर्क सिग्नल असल्याचे मानले जात आहे.
अहवालानुसार, कंपनीच्या ग्राहकांमध्ये सलग 36 व्या महिन्यात घट झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या या कंपनीने गेल्या वर्षभरात फक्त 14 लाख नवीन 4G ग्राहक जोडले आहेत. या काळात एअरटेलने तब्बल 3.4 कोटी तर जोडले आणि जिओने 2 कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत.