मुंबई : अनेक कार निर्मात्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेली किंमत 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे त्यांना त्यांच्या वाहनांच्या किंमतीत वाढ करावी लागत आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar) ने देखील आपल्या सर्व उत्पादनांच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा या लोकप्रिय कारची विक्री करणाऱ्या कंपनीने सांगितले की, वाहनांच्या वाढलेल्या किमती 1 एप्रिलपासून लागू होतील. वाढत्या खर्चाचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे कंपनीने म्हटले आहे.
BMW इंडिया देखील वाहनांच्या किमती वाढ करणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे, की 1 एप्रिल 2022 पासून कंपनी आपल्या वाहनांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. बीएमडब्ल्यू कंपनीच्या म्हणण्यानुसार, किमतीत वाढ झाल्याने किंमत वाढ करावी लागली आहे. साहित्य आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीला किंमत वाढ करावी लागली आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियानेही सर्व कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले, की त्यांचे सर्व प्रकारच्या कार आता तीन टक्क्यांपर्यंत खर्चिक असतील. अन्य प्रकारच्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने जास्त खर्चामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, या दरवाढीचा ग्राहकांना फारसा त्रास होऊ नये, यासाठी कंपनीने प्रयत्न केले आहेत. कंपनीकडून किरकोळ विक्री केल्या जाणाऱ्या कारच्या किमती पुढील महिन्यापासून 50,000 ते 5 लाख रुपयांनी वाढणार आहेत.
चारचाकीचे स्वप्न आणखी खर्चिक..! आता ‘या’ कंपनीने दिलाय बजेटला झटका; पहा, किती केलीय दरवाढ..?