मुंबई : अदानी पोर्ट्स अँड सेझ (एपीएसईझेड) लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बंदर ऑपरेटर कंपनी आहे. आता या कंपनीने पश्चिम बंगाल सरकारच्या ताजपूर बंदर प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावली आहे. APSEZ ने बंदर शर्यतीत JSW समूहाला मागे टाकले आहे, असे अधिकृत सूत्राने शुक्रवारी सांगितले. आर्थिक बोली फेरीत फक्त APSEZ आणि JSW यांचा सहभाग होता. मात्र, सुरुवातीच्या फेरीत आणखी काही कंपन्यांनी रस दाखवला होता. त्यामुळे हे आणखी एक बंदर सुप्रसिद्ध गुजराती उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adni) यांच्या ताब्यात जाणार आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे इकॉनॉमिक टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, बंदर प्रकल्पासाठी APSEZ ने सर्वाधिक बोली लावली आहे. “एपीएसईझेडने एकूण महसुलाच्या 0.25 टक्के तर दुसर्या कंपनीने 0.23 टक्के हिस्सेदारीसाठी बोली लावली होती,” असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की महसूल वाटा 4 टक्क्यांपर्यंत वाढेल परंतु तो 99 वर्षांच्या वाढीव कालावधीच्या शेवटी असेल. अधिकाऱ्याने सांगितले की APSEZ सर्वात मोठी बोलीदार म्हणून उदयास आल्यानंतर, एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे जो राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाईल.
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात स्थित या प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे 7,000 कोटी रुपये आहे. पश्चिम बंगाल सरकारला प्रकल्पाचा पहिला टप्पा तीन-चार वर्षांत पूर्ण होण्याची आणि कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. APSEZ ने दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत संपादन, बांधकाम आणि विकासाद्वारे देशातील अनेक बंदरांवर ताबा मिळवला आहे. अदानी समुहाकडे आता देशातील बंदर क्षमतेपैकी 24 टक्के हिस्सा आहे. (Adani Makes Highest Bid For Tajpur Port)