मुंबई : देशातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आता ब्रँडेड तांदूळ बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. खरं तर, अदानी समूहाचा एक भाग असलेल्या अदानी विल्मरने (Adani Wilmar) पीठ आणि तांदूळ यांसारख्या मुख्य खाद्य पदार्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अदानी विल्मर आता अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक तांदूळ ब्रँड आणि प्रक्रिया युनिट्स (Processing Unit) घेण्याचा विचार करत आहे.
पीटीआयने कंपनीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अदानी विल्मर फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत ब्रँडेड तांदूळ (Rice) सादर करणार आहे. एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमधून (West Bengal) याची सुरुवात होईल. अदानी विल्मरने पश्चिम बंगालमधील तांदूळ प्रक्रिया युनिट विकत घेऊन या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या क्षेत्राचा आकार दरवर्षी 3 ते 3.5 कोटी टन इतका आहे.
“दैनंदिन वापरातील तांदूळ विभागात वेगाने वाढ करण्याचे आमचे ध्येय आहे. रेशन दुकानांद्वारे अन्नधान्य वितरणा व्यतिरिक्त त्याची बाजारपेठ दरवर्षी 3 ते 3.5 कोटी टन इतकी आहे. जलद वाढीसाठी आम्ही अनेक राज्यांमध्ये ब्रँड्स आणि तांदूळ प्रक्रिया युनिट्सच्या अधिग्रहणाच्या शोधात आहोत.” असे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) सांगितले.
नवीन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील तर अधिग्रहणामुळे वाढ होईल असे ते म्हणाले. कंपनी आधीच बासमती तांदळाच्या व्यवसायात आहे. मात्र, या तांदळाचा वापर फक्त 10 टक्के आहे. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रादेशिक स्थानिक तांदळाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या विभागात भरपूर संधी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही प्रादेशिक पसंतीनुसार पॅकेज केलेले स्थानिक तांदूळ सादर करू. बंगालमध्ये आम्ही बांसकाटी आणि मिनिकेट तांदूळ सादर करू जे इथल्या सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. सोना मसुरी उत्तर प्रदेशात लोकप्रिय आहे आणि कोलम तांदूळ दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. अदानी विल्मर या कंपनीने अधिग्रहणासाठी 450-500 कोटी रुपये तरतूद केली आहे. खाद्य पदार्थांमध्ये कंपनीचा मुख्य भर पीठ आणि तांदळावर आहे.
गौतम अदानी तर जोरातच की..! पहा आता कोणती कंपनी घालणार आहेत खिशात..!