मुंबई : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर लोकांना महागाईने जबरदस्त झटके दिले आहेत. आज सकाळीच पेट्रोल डिझेलचे दर वाढले. त्यानंतर घरगुती गॅस टाकीच्या दरात तर थेट 50 रुपये वाढ झाली. हे कमी म्हणून की काय आता विमान कंपन्यांनीही वाढलेल्या इंधन दराचे कारण देत तिकीट दरात वाढ केली आहे. विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे काही मार्गांवर विमान भाडे (Air fare) जवळपास दुप्पट झाले आहे. दिल्ली-मुंबई, हैदराबाद-दिल्ली आणि चेन्नई-दिल्ली या व्यस्त मार्गांवरील सरासरी भाडे एक वर्षाआधीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढले आहे.
21 ते 31 मार्च दरम्यान देशातील सर्वात व्यस्त मार्ग असलेल्या दिल्ली ते मुंबईला जाण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांना एकेरी तिकीट भाडे सुमारे 7,956 रुपये द्यावे लागतील. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Ixigo वरील माहितीनुसार, हे भाडे एका वर्षाआधीच्या तुलनेत जवळपास 60% जास्त आहे. याच कालावधीसाठी हैदराबाद-दिल्ली, चेन्नई-दिल्ली आणि मुंबई-बेंगळुरू मार्गावरील फ्लाइट्ससाठी एकेरी तिकिटांची किंमत अनुक्रमे 8,253 रुपये, 9,767 रुपये आणि 6,469 रुपये आहे. हे भाडे एका वर्षाआधीच्या तुलनेत अनुक्रमे 60%, 64% आणि 44% जास्त आहे. कोलकाता-दिल्लीच्या तिकीट दरात 43 टक्के आणि दिल्ली-बेंगळुरूच्या तिकीट दरात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जेट इंधनाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यामुळे व्यस्त मार्गावरील विमान प्रवास तिकीट दर वाढले आहे. तथापि, तिकीटाचे दर वाढले असूनही, येत्या उन्हाळी हंगामासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची मागणी वाढू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या (ATF) किमतीत वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात हवाई इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि पेट्रोलियम कंपन्यांनी एटीएफच्या किमती 17,135.63 रुपये प्रति किलोलीटरने वाढ केल्या.
दिल्लीत ATF 18.3 टक्क्यांनी खर्चिक झाले आहे आणि नवीन किंमत 1,10,666 रुपये प्रति किलोलीटर आहे. कोलकाता येथे जेट इंधनाची किंमत 1,14,979 रुपये प्रति किलोलिटर आहे. चेन्नईमध्ये 1,14,133 रुपये, दिल्लीमध्ये 1,10,666 रुपये आणि मुंबईत 109,119 रुपये प्रति किलोलीटर आहे. यावर्षात सहाव्या वेळेस एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांचे विमान जमिनीवर..! विमान इंधनाच्या बाबतीत पुन्हा घडलाय ‘तो’ प्रकार; जाणून घ्या..