Russia-Ukraine War : मोठ्या कंपन्यांचा रशियाला झटका; पहा, कसे बिघडलेय रशियाचे अर्थकारण..?
दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारले आहे. आज 13 दिवसांनंतरही युद्ध थांबलेले नाही. या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. तर दुसरीकडे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक देशांनी रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या निर्बंधांचा फटका रशियाला बसत आहे. रशियावर रोजच नवीन निर्बंध टाकले जात असल्याने आजमितीस रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश ठरला आहे. या निर्बंधांमुळेच रशियात आणखी एक संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक कंपन्यांनी रशियामध्ये आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांनी आर्थिक निर्बंध टाकले आहेत. मंगळवारी फेरारी आणि लॅम्बोर्गिनीसह इतर अनेक कंपन्यांनी रशियामधील त्यांचे व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली. L’Oreal ने रशियामधील ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय युनिलिव्हरने रशियाला उत्पादनांची निर्यात आणि आयात स्थगित करण्याची घोषणाही केली आहे.
मॅकडोनाल्ड रशियामधील सर्व 850 रेस्टॉरंट तात्पुरते बंद करत आहे. परंतु, कंपनी रशियातील आपल्या 62,000 कर्मचाऱ्यांना पगार देणे सुरू ठेवेल. रॉयटर्सच्या वृत्तनुसार स्टारबक्स देखील रशियामधील आपली कॅफे अनिश्चित काळासाठी बंद करणार आहे. तसेच, कोकाकोला, यूनिवर्सल म्यूजिक ग्रुप, पेप्सीको, नेटफ्लिक्स या कंपन्यांनीदेखली रशियामधील आपला कारभार बंद केला आहे. या निर्बंधांचा फटका रशियाला बसत आहे.
आता तर अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्यावरही बंदी घातली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्के बसत आहेत. या निर्बंधांतून मार्ग काढण्यासाठी रशियन सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता रशियाच्या अडचणी वाढणार हे मात्र नक्की आहे.
Russia Ukraine War Live: रशियाने वाढवली जगाची डोकेदुखी; पहा काय चालू आहे युद्धाच्या मैदानात